धान्य मार्केटमध्ये दुपार पर्यत गर्दी; आंब्याला वालीच नाही

लॉकडाऊन चा परिणाम
धान्य मार्केटमध्ये दुपार पर्यत गर्दी; आंब्याला वालीच नाही

पंचवटी | Panchvati

पेठरोडवरील बाजार समितीच्या आवारात अक्षय तृतीय व रमजान ईद या सणांमुळे फळांच्या बाजारात खरेदीसाठी मंगळवारी गर्दी झाली होती. बुधवारीही दुपारी बारावाजेपर्यंत येथील दुकाने खुली राहणार असल्याने गर्दी होण्याची शक्यता वर्तविली जात होती.

येथील फळ विक्रेत्यांनी दुकाने मांडली होती. मात्र, त्याच्या खरेदीसाठी फार थोड्या प्रमाणात ग्राहक येत होते. मात्र, किराणा खरेदी करण्यासाठी या बाजारात सकाळपासून गर्दी झाली होती.


नाशिकमध्ये करोनाचा प्रादुर्भाव कमी करण्याच्या दृष्टीने उपाययोजना करताना पालकमंत्री, जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्त यांनी दहा दिवसांचा कडक लॉकडाउन करण्याचा निर्णय घेतला, त्याची अंमलबजावणी बुधवारी दुपारी बारावाजेपासून सुरु झाली.

दुपारी बारापर्यंत दुकाने उघडी असल्यामुळे पेठरोडच्या मार्केटमधील किराणा दुकानात खरेदीसाठी प्रचंड गर्दी झाली होती. दुपारनंतर बाहेर पडता येणार नसल्याने सकाळीपासून दुकानांच्या समोर रांगा लागल्या होत्या.


फळांच्या बाजारात मंगळवारच्या तुलनेत गर्दी एकदमच ओसरली. दहा दिवस बंद असल्यामुळे येथील विक्रेत्यांना बाहेरून येणाऱ्या फळांच्या वाहनाच्या ऑर्डर रद्द केल्या आहेत. त्यामुळे बाहेरून येणाऱ्या फळांची आवक थांबली. येथील विक्रेत्यांकडे असलेल्या फळे विक्रीसाठी गाळ्यांच्या समोर मांडली होती.

मात्र, मंगळवारच्या तुलनेत बुधवारी फारसे ग्राहक फिरकले नाहीत. सणांमुळे ज्या दिवसात फळांची मोठ्या प्रमाणात विक्री होणे अपेक्षित होते. त्याचवेळी वेळी लॉकडाउन जाहीर झाल्याने मुख्य बाजारातील ही विक्री ठप्प झाल्याचे चित्र दिसले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com