
नाशिक | Nashik
देशभरात सर्वत्र दिवाळीच्या सणाचा उत्साह पाहायला मिळत असून दिवाळीच्या साहित्यांनी बाजारपेठा फुलून गेल्या आहेत. बाजारात नागरिकांची कपडे, दिवे,आकाशकंदीलसह विविध साहित्य खरेदी करण्यासाठी झुंबड उडाली आहे. तसेच आज लक्ष्मीपूजन (Lakshmipujan) असल्याने या दिवशी झेंडूच्या फुलांना (Marigold Flower) विशेष महत्त्व असते. घराच्या प्रवेश द्वारावर वाहनांना झेंडूच्या फुलांपासून बनवलेला हार लावला जातो. त्यामुळे नाशिक शहरातील विविध ठिकाणी नागरिकांनी झेंडूची फुले खरेदी करण्यासाठी गर्दी केली असून आज झेंडूच्या फुलांचे दर वाढल्याचे चित्र आहे...
शहरातील गंगाघाट, गाडगे महाराज पटांगणासह विविध ठिकाणी झेंडूची फुले विकण्यासाठी विक्रेते पहाटेपासूनच शहरात दाखल झाले असून झेंडू खरेदीला नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचे चित्र आहे. यंदा मार्केटमध्ये लाल झेंडू, पिवळा झेंडू, शेवंती, गुलाब, कमळ आदी फुले विक्रीसाठी दाखल झाले आहेत. यावेळी विक्रेत्यांनी रस्त्याच्या दुतर्फा ग्राहकांच्या सोयीसाठी दुकाने थाटल्याचे पाहायला मिळत आहे.
दरम्यान, दसऱ्याच्या दिवशी फुलांना समाधानकारक भाव न मिळाल्याने शेतकरी असमाधानी होता. मात्र, एन दिवाळीत (Diwali) फुलांचे भाव वाढल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळत आहेत. त्यानंतर आज झेंडूच्या फुलांना ४०० ते ५०० रुपये कॅरेट आणि १५० ते २०० रुपये शेकडा भाव मिळाल्याचे चित्र आहे. तर फुलांच्या माळा ६० ते १०० रुपयांपर्यंत विकल्या जात आहेत. याशिवाय शेवंतीच्या फुलांचे दर १५० रुपयांपासून पुढे असून १०० रुपये डझन विकले जात आहे.