लासलगाव बाजारात गर्दी

लासलगाव बाजारात गर्दी

लासलगाव । वार्ताहर

करोना रुग्णांची संख्या आटोक्यात आल्यावर शासनाने निर्बंध उठवताच गेल्या दोन दिवसांपासून दुकाने सुरू झाली आणि खवय्यांच्या जिभेचे चोचले पुरवले गेले. सर्व दुकाने व रस्ते गर्दीने फुलून गेले होते. आठवडे बाजारापेक्षाही लासलगाव शहरातील प्रत्येक दुकानापुढे व रस्त्यावर ग्राहकांची गर्दी दिसून आली. साहजिकच शासनाच्या सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे पाहावयास मिळाले.

करोना संसर्ग टाळण्यासाठी शासनाने गेले काही महिने सर्व दुकाने बंद ठेवत लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी केली होती. मात्र आता करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने शासनाने सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत दुकाने उघडण्यास परवानगी दिल्याने तालुक्याच्या प्रत्येक बाजारपेठेत गर्दीचा माहोल दिसून आला. लासलगाव येथेही सर्वच दुकाने उघडल्याने व विशेषत: हॉटेल्स चालू झाल्याने नागरिकांनी पाणीपुरी, वडापाव, समोसा, जिलेबी, तर्रीची मिसळ या खाद्यपदार्थांबरोबरच इतर खरेदीला एकच गर्दी केली. नागरिकांनी वडारस्सा, आवडीचा चहा यांचा आस्वाद घेतला .भेळभत्ता खरेदीला गर्दी दिसून आली.

येथील ग्राहकांचा आवडता उमाचा पेढाही खरेदी केला असल्याचे पवन कायस्थ यांनी सांगितले. खवय्यांच्या गर्दीला उसंत नव्हती. गेले काही महिने करोनामुळे नागरिक बाहेरचे पदार्थ खाण्यास स्पष्ट नकार देत असत. त्यात आज आमूलाग्र बदल झाल्याचे दिसून आले. मिठाई दुकानांतही ताजी मिठाई घेण्याकडे कल दिसून आला, असे क्वॉलिटी जनरलचे संजय बिरार यांनी सांगितले. तर बरेच दिवसांनी दुकाने उघडल्याने नागरिकांनी इलेक्ट्रॉनिक साहित्य खरेदीकरता दुकाने गाठली. परंतु फॅन आणि डिशचे सामान खरेदीची ग्राहक संख्या मोठी होती, असे समर्थ इलेक्ट्रॉनिकचे बापूसाहेब लचके यांनी सांगितले.

लॅपटॉप आणि संगणक दुरुस्तीकरता ग्राहकांची विचारणा होती. परंतु लॉकडाऊनमुळे स्पेअर पार्ट मिळत नाही, असे श्री कॅम्प्युटर्सचे श्रीकांत माळी यांनी सांगितले. सलून सुरू झाल्याने ग्राहकांची करोनाविषयक काळजी घेऊन शासनाने घालून दिलेल्या नियमात ग्राहकांचे केस कापण्याचे काम केल्याचे अनिल वाघ यांनी सांगितले.

इतरही बाजारपेठेत गर्दी

निफाड, पिंपळगाव बसवंत, ओझर, सायखेडा, विंचूर आदी बाजारपेठेतदेखील ग्राहकांनी खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. निफाड येथे पहिल्याच दिवशी नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी श्रीया देवचके यांनी निफाड शहरात फिरून अनावश्यक दुकाने बंद केली. मात्र ही कारवाई शहरापुरतीच मर्यादित असल्याने बसस्थानक, उगावरोड, औरंगाबाद रोड आदी परिसरातील अनावश्यक दुकानेदेखील सुरू असल्याचे पाहावयास मिळाले. त्यामुळे गर्दीत भर पडून सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाल्याचे पाहावयास मिळाले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com