रस्ता ओलांडणे बनले मुश्कील

गांधीनगर प्रवेशद्वारासमोरील प्रकार; इंधनाची नासाडी; नागरिक त्रस्त
रस्ता ओलांडणे बनले मुश्कील

नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad

नाशिक-पुणे महामार्गावरील ( Nashik-Pune Highway ) भारत सरकार मुद्रणालय(Government of India Press,), गांधीनगर प्रेसगेट समोरून रस्ता ओलांडणे दिवसेंदिवस मुश्कील होऊन बसले आहे. या ठिकाणी दररोज अपघात घडत असल्याने तातडीने कठोर उपाययोजना करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

नाशिक-पुणे महामार्गावरील गांधीनगर प्रेसगेट समोरून गांधीनगर प्रेस, रहिवासी भाग, रामदास स्वामीनगर, उपनगर, आगर टाकळीकडे जाण्यासाठी बहुसंख्य वाहनधारक या रस्त्याचा वापर करतात. प्रेसमधील कर्मचारी नाशिक शहर, नाशिकरोडकडे जाण्यासाठी येथूनच मार्गक्रमण करतात. वाहनधारकांच्या दृष्टीने सदरचा रस्ता फारच सोयीचा आहे. असे असले तरी प्रेसगेट समोरील वळण वाहनधारकांना त्रासदायक वाटू लागले आहे.

आंबेडकरनगर सिग्नलवर अनेकदा वाहतूक पोलीस उपस्थित नसल्याने येथून दुचाकी, चारचाकी, रिक्षा, टेम्पो, ट्रक, डंपर आदी अवजड वाहनांची सतत वर्दळ असते. परंतु कोणाचाच अंकुश नसल्याने वाहतुकीचे नियम सर्रासपणे पायदळी तुडवले जातात. याचा फटका प्रेसमधील कर्मचारी वर्ग, सर्वसामान्य वाहनधारकांना बसत असल्याने याठिकाणी रोजच बाचाबाचीचे प्रसंग घडू लागले आहेत. दोन दिवसांपूर्वी एका दुचाकीला केवळ कट लागला, म्हणून वादावादीचे प्रसंग घडले होते. एखादा किरकोळ अपघात घडल्यास वाहनधारकांच्या रस्त्यावर अक्षरशः रांगा लागतात. कोंडी होऊन वाहतुकीचा बोजवारा उडतो. वाहनांच्या कर्णकर्कश हॉर्नमुळे कानठळ्या बसतात. ध्वनी प्रदूषण, वायू प्रदुषण नियंत्रणा बाहेर जाते. प्रेस व इतर ठिकाणी जाण्यासाठी वाहनधारकांना बराच वेळ रस्ता मोकळा होण्याची वाट पाहावी लागते. परिणामी वेळ आणि इंधन यांचा मोठा अपव्यय होतो.

नाशिकरोडहून येणार्‍या वाहनधारकांना वळण घेऊन गांधीनगर प्रेस रस्त्याने जाणे म्हणजे मृत्यूच्या दाढेतून गेल्यासारखे वाटते, असे अनुभव वाहनधारक सांगतात. वळण घेण्यासाठी दुभाजकाला पंक्चर केले. परंतु हेच पंक्चर आता वाहनधारकांच्या जीवावर उठले आहे. पाच मिनिटाच्या अंतरावर सिग्नल असूनही बेशिस्त वाहतुकीला शिस्त लावण्यास पोलीस बळ अपुरे जाणवते. शिस्त नावाचा प्रकार कुठेच दिसून येत नाही.

यापूर्वी याच पंक्चरवर अनेक अपघात घडले आहेत. थोड्याच पुढे गांधीनगर बसथांबा असल्याने प्रवाशी, लहान शाळकरी मुलेमुली, ज्येष्ठ नागरिक, वयोवृध्द महिला येथे उभे असतात. परिणामी येथे मोठा अपघात घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुख्य म्हणजे सकाळी 9 आणि सायंकाळी 5.30 वाजता परिस्थिती अगदी हातघाई वर येते. याच वेळेस वाहतूक पोलिसांची आवश्यकता असताना नेमके त्यावेळेस ते गायब असतात. यावर कठोर उपाययोजना करून शिस्त लावण्यासाठी शहर वाहतूक पोलीस विभागातील अधिकारीवर्गाने लक्ष घालावे, अशी मागणी प्रेस कर्मचारी, वाहनधारकांच्या वतीने करण्यात आली आहे.

गांधीनगरमधून नाशिक किंवा नाशिकरोडकडे जाताना महामार्गाच्या दुभाजकातील पंक्चर ओलांडताना अर्धा तास वाट बघावी लागते. यात इंधनासह वेळेची नासाडी होते. महत्वाच्या कामासाठी वेळेवेर इच्छितस्थळी पोहोचता येत नाही. संबंधित यंत्रणेने या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन उपाययोजना कराव्या व प्रेस कामगारांसह सर्वसामान्यांना दिलासा द्यावा.

अशोक परदेशी, प्रेस कामगार

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com