अर्ध्या तासाचा पाऊस; चार महिन्याचे पीक मातीत

अर्ध्या तासाचा पाऊस; चार महिन्याचे पीक मातीत

आहुर्ली | वार्ताहर Ahurli

सध्या ईगतपुरी त्रंबकेश्वर तालुक्यात सर्वत्र भात, नागली, वरई आदी खरीप पिक कापणी, झोडणीचा हंगाम सुरु आहे. शेतकऱ्यांची ऐन दिवाळीत शेती कामे आटोपण्याची घाई सुरु असतानाच आहुर्ली सह परिसरात तब्बल अर्धा ते पाऊण तास कोसळलेल्या पावसाने खरीपाचे अतोनात नुकसान केले आहे...

तब्बल चार महिन्याचे श्रम यामुळे वाया गेले असून खर्चही निघेनासा झाल्यामुळे बळीराजा पुन्हा अस्मानी संकटाच्या कचाट्यात सापडला आहे. दिवाळी पाडव्याच्या दिवशीच पावसाने हजेरी लावल्यामुळे अनेकांच्या आनंदावर विरजण पडले आहे.

या पावसामुळे शेतात उभ्या असलेल्या, सोंगलेल्या व खळयावर वाहुन ठेवलेल्या भात पिकासह नागली, वरईचेही प्रचंड नुकसान झाले आहे. यामुळे अगदी हाता तोंडाशी आलेला घास नैसर्गिक आपत्ती मुळे हिरावला गेला आहे.

याच बरोबर परिसरात काही बागायती पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये टोमॅटो, काकडी, दोडका व मिरची आदी भाजीपाला पिकाचे अधिक नुकसान झाले आहे.

याचबरोबर झोडणीनंतर उरलेल्या वैरणीचा जनावरांसाठी चारा म्हणून वापर होतो. या चारयाचेही यामुळे नुकसान झाले असुन आगामी काळात जनावरांच्या चार्याचीही तीव्र टंचाई होण्याची भीती व्यक्त होत आहे.

नुकसानीचे तातडीने पंचनामे करुन शेतकऱ्यांना शासन स्तरावर तातडीने मदत करावी अशा भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केलेल्या आहेत.

चार महिन्याचे श्रम गेले वाया

आम्ही पावसा पाण्यात चार महिने भात, नागली, वरई आदीची लागवड केली. या पिकांसाठी पाण्या पावसात राबलो. हे चार महिन्याचे कष्ट या पावसामुळे वाया गेले असुन, शेतकऱ्यांचे तर कंबरडेच मोडले आहे. शासनाने तातडीने या नुकसानीची दखल घेऊन शेतकऱ्यांना दिलासा दयावा.

-- पिंट्या शिद, शिदवाडी, म्हसुर्ली, नुकसान ग्रस्त शेतकरी

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com