सणासुदीच्या काळात बळीराजावर अस्मानी संकट..!

जास्त पावसाचा पिकांवर दुष्परिणाम
सणासुदीच्या काळात बळीराजावर अस्मानी संकट..!

नाशिक | Nashik

वातावरणात होत असलेला बदल, वाढलेले तापमान व बरसत असलेल्या पावसामुळे द्राक्ष बागांसह डाळींब व भाजीपाला पिकांवर विविध प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शेतकर्‍यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

त्यातच वीजेचा लपंडाव होत असल्याने बळीराजा ऐन सणासुदीच्या दिवसात मेताकुटीला आला आहे.

चालू वर्षी अतिवृष्टीमुळे शेतात पाणी घुसल्याने त्याचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील शेतकर्‍यांना बसत आहे. ज्यांच्याकडे विहिरी आहेत त्या तुडुंब भरल्या आहेत.

नगदी पिके म्हणून टोमॅटो, कोथंबिर, मेथी, शेपू, कांदापात, काकडी, भेंडी, दोडके, भोपळा, गिलके, ढोबळी मिरची, कोबी, फ्लावर आदींची लागवड केलेली असताना जास्त पावसाने ती सडून गेली. सोयाबीन सुरूवातीच्या पावसापर्यंत काढणीपर्यंत आले. मात्र अतिवृष्टीमुळे या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यातच त्याचा दर्जा खालावत जाऊन वजन पन्नास टक्क्यांनी घटले आहे.

अशीच परिस्थिती भात पिकाची झाली आहे. पावसाळ्यात तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात खात्रीचे पिक म्हणून टोमॅटोला पसंती दिली जाते. मात्र यंदा पिक जरी जोमदार आले तरी सुरुवातीला मिळालेला भाव नंतरच्या काळात कमी होत असल्याने यातही शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान होत आहे.

तालुक्यात सर्वात जास्त क्षेत्र द्राक्ष लागवडीखाली असून आळंदी धरणाच्या पोटचारीचे पाणी गिरणारेपासून आडगावपर्यंत सोडले जाते. पावसाळ्यानंतर रब्बीच्या हंगामात सोडण्यात येणारे आवर्तन यावर शेतकर्‍यांचे गणित अवलंबून आहे. हीच परिस्थिती वालदेवी धरणाबाबतही होऊ शकते.

या धरणातून सोडले जाणारे पाणी लगतच्या बारा गावांना कोल्हापूर टाईप बंधारे घालून (केटी वेअर) अडवले गेले आहेत. त्याचा फायदा रब्बी हंगामासाठी या गावांना होत असतो. याकडे या भागातील शेतकर्‍यांचे डोळे लागले आहेत.

वातावरणातील बदलामुळे व ऑक्टोबर छाटणीनंतर द्राक्ष बागांवर मोठा परिणाम होऊ लागला असून औषध फवारणीसाठी आताच खर्च वाढत आहे. चालू हंगामात खरीपाची पिके शेतकर्‍यांसाठी काही प्रमाणात आर्थिक नुकसानीचे ठरू पहात आहे.

भाजीपाला पिकांसाठी आवश्यक असणारे वातावरण नसल्याने रोगराईचे प्रमाण वाढून ही पिके मोठ्या प्रमाणावर नष्ट होत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी लावलेला पैसा पाण्यामुळे पाण्यात जातो की काय, अशी परिस्थिती तालुक्यात दिसून येते. यंदा तालुक्यात सरासरीपेक्षाही जास्त पाऊस झाला आहे.

त्यामुळे सध्यातरी तालुक्यात एकही टँकर कोणत्याही गावाला सुरू नसून पिण्याच्या पाण्याचे नियोजन तालुका पातळीवर यापुर्वीच झाले आहे. त्यातही परतीच्या पावसाने शेवटच्या टप्प्यात जोरदार हजेरी लावल्याने पिकांचे नुकसान होत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com