पावसाची दडी, दुबार पेरणीचे सावट

खरीप हंगाम लांबल्यास रब्बीवर परिणामाची शक्यता
पावसाची दडी, दुबार पेरणीचे सावट

निफाड । प्रतिनिधी Niphad

सुरुवातीला मान्सूनपूर्व बरसलेल्या पावसावर शेतकर्‍यांनी शेतीची पेरणीपूर्व मशागत करुन खते, बियाणे घेतले, तर काही शेतकर्‍यांनी ( Farmers ) खरिपाची ( Kharif Season ) पेरणी देखील पूर्ण केली होती. मात्र आता पावसानेच ( Rain ) पाठ फिरवल्याने पहिल्या पावसावर पेरणी झालेली पिके जळू लागली असून शेतकर्‍यांपुढे दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे.

गेल्या दोन वर्षापासून करोना प्रादुर्भावामुळे शेतमाल बाजारपेठेत विकता येत नसल्याने शेतकर्‍यांची मोठी कोंडी झाली होती. यावर्षी बाजारपेठेत शेतमाल विक्री होवू लागला आहे. मात्र खते, बियाणे, पेट्रोल, डिझेलसह जिवनावश्यक वस्तूच्या किंमतीत भरमसाठ वाढ झाल्याने सामान्य नागरिकांना जगणे अवघड झाले आहे.

मागील वर्षी खरीप हंगामाच्या पेरणी वेळेस अखेरच्या टप्प्यात बियाणांची टंचाई निर्माण झाली होती. परिणामी शेतकर्‍यांनी मका, सोयाबीन, कांदा, बाजरी, मूग, तूर, उडीद, कपाशी आदी बियाणे आगावू घेवून ठेवली तर तालुक्यातील काही शेतकर्‍यांनी मे महिन्याच्या अखेरीस व जूनच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या पावसावर पेरणी केली होती.

मात्र त्यानंतर पावसाने पाठ फिरविली असून अद्यापपर्यंत पाऊस पडण्याची लक्षणे दिसत नाही. साहजिकच पेरणी झालेली ही पिके पावसाअभावी वाया जावू लागल्याने शेतकर्‍यांपुढे दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे.

यावर्षी पाऊस लांबल्याने खरीपाचा हंगाम देखील लांबणार असून साहजिकच पुढील रब्बी हंगामाच्या पेरण्यांवर त्याचा विपरित परिणाम होणार आहे.

शेतकरी खरीप हंगामात मका, सोयाबीन आदी पिके घेवून रब्बी हंगामात उन्हाळ कांदा पिकाला प्राधान्य देत आला आहे.

मात्र आता खरिपाचा हंगाम लांबल्याने उन्हाळ कांद्यासाठी अखेरच्या टप्प्यात उन्हाची तीव्रता आणि पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. त्यातच उष्णतेमुळे कांदा पाहिजे त्या प्रमाणात होणार नाही. पाऊस लांबल्याने शेतकर्‍यांचे नियोजन कोलमडले असून आता पाऊस पडल्यानंतर पेरण्यांना वेग येण्याची शक्यता आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com