समृद्धी महामार्गालगत दरोडा; टोळीकडून कुटुंबियांना मारहाण

समृद्धी महामार्गालगत दरोडा; टोळीकडून कुटुंबियांना मारहाण

वावी | वार्ताहर Wavi

सिन्नर तालुक्यातील मलढोण (Maldhon Tal Sinnar) येथे मध्यरात्री १० ते १२ जणांच्या टोळक्याने दरोडा (Robbery) टाकत दहा ते बारा तोळे सोने लंपास केले. तसेच प्रतिकार करणाऱ्या कुटुंबियांच्या डोक्यात मद्याच्या बाटल्या फोडल्या आणि विटांचा माराही करत जखमी केले. नव्याने होत असलेल्या समृद्धी महामार्गालगत (Samrudhi Highway) अशी घटना घडल्यामुळे सिन्नर तालुका हादरला आहे....

अधिक माहिती अशी की, मलढोण येथे वाल्मिक दगडू सरोदे यांची वस्ती आहे. मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास 10 ते 12 जणांच्या टोळक्याने पडवीत झोपलेल्या वाल्मिकराव सरोदे (वय 50) पत्नी विमल 46, आई रखमाबाई 80 यांच्यावर मद्याच्या बाटल्यांचा मारा तसेच विटांचा मारा करत जखमी केले.

यावेळी कुटुंबातील सदस्यांनी आरडाओरड केल्याने घरातील सर्वजण उठले. घरातली मुले बाहेर आल्यावर टोळक्याने विटांचा मारा केला. यावेळी योगेश, तुळशीराम, नितीन, किशोर या चौघांनी दरोडेखोरांशी सामना केला.

मात्र, त्यांनी घरात घुसून दोन कपाट उघडून 10 ते 12 तोळे सोने लंपास केले. महिलांच्या गळ्यातील व कानातील सोन्याचे दागिने (jewelry robbery) हिसकावून घेतले. सरोदे कुटुंबीय आरडाओरड करत बाजूच्या वस्तीवर मदत मागण्यासाठी प्रयत्न करत होते. मात्र, काही क्षणातच तिथून चोरटयांनी पोबारा केला.

दरम्यान, नितीन याने गज मारून एका चोरट्याला खाली पाडले. त्याची दुचाकी देखील पडली. त्याला तिघा भावानी पकडून ठेवले. बाकीचे मात्र शेतातून व दुचाकीवरून समृद्धी महामार्गाकडे पळून गेले. पोलिसांना घटना समजल्यानंतर घटनास्थळी पोलीस आले. यानंतर वाल्मिक सरोदे यांना प्रथम दोडी व तेथून सिन्नरच्या खाजगी दवाखान्यात हलवण्यात आले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे समजते. (one suspects arrested)

यावेळी डीवायएसपी सोमनाथ तांबे (DYSP Somnath Tambe), एपीआय सागर कोते (API Sagar Kote) यांनी पहाटे वस्तीवर भेट दिली. तसेच वस्तीवरील दोघांचे मोबाईल गायब आहेत व एका दरोडेखोराचा मोबाईल घटनास्थळी सापडला आहे. पोलिसांकडून तपासाची दिशा निश्चित होत आहे. गुन्ह्यातील सहभागी पोलिसांच्या रडारवर आहेत. यावेळी संशयित ऋषीकेश राठोड (वय 25 रा. रुई ता. कोपरगाव) हा पोलिसांच्या ताब्यात असून त्यास नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com