नाशिकच्या विकासात क्रेडाईची भूमिका सकारात्मक : मनपा आयुक्त

नाशिकच्या विकासात क्रेडाईची भूमिका सकारात्मक : मनपा आयुक्त

नाशिक । प्रतिनिधी Nashik

ऐतिहासिक महत्त्व असलेल्या नाशिक शहरामध्ये विकासासाठी (Development in Nashik city)पोषक अशा मूलभूत सोयी सुविधा आहेत. त्यामुळे शहराकडे सकारात्मकरीत्या बघण्याची दृष्टी असणार्‍या क्रेडाई ( CREDAI) संस्थेसोबत असल्याने आगामी काळातदेखील नाशिक प्रगतिपथावर जाईल, असे प्रतिपादन मनपा आयुक्त रमेश पवार (Municipal Commissioner Ramesh Pawar)यांनी केले.ते क्रेडाई नाशिक मेट्रोच्या ( CREDAI Nashik Metro)वार्षिक सभेमध्ये बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर मुद्रांक जिल्हाधिकारी कैलास दवंगे, क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष रवी महाजन, राष्ट्रीय क्रेडाईचे उपाध्यक्ष अनंत राजेगावकर, राष्ट्रीय क्रेडाईचे घटना समिती सल्लागार जितूभाई ठक्कर, महाराष्ट्र क्रेडाईचे सचिव सुनील कोतवाल, नाशिक क्रेडाई मेट्रोचे मानद सचिव गौरव ठक्कर, माजी अध्यक्ष सुरेश पाटील व उमेश वानखेडे, नाशिकचे मुद्रांक जिल्हाधिकारी कैलास दवंगे व जीएसटी सल्लागार संकेत शहा उपस्थित होते.

यावेळी आयुक्त पवार यांनी प्रामुख्याने शहर विकासाच्या शॉर्ट टर्म व काही लाँग टर्म योजना, ब्ल्यू लाईनमध्ये डीपी रोड साईडने सिव्हर लाईन टाकणे, दादासाहेब फाळके स्मारकाचा विकास फिल्म सिटीच्या धर्तीवर, पहिल्या वर्षी सहा रोड तयार करणार, आयटी पार्क, लॉजिस्टिक पार्क, निओ मेट्रोला गती देण्याचा मनोदय व्यक्त केला. सोबतच बांधकाम वेस्टचे योग्य नियोजन तसेच रेन वॉटर हार्वेस्टिंग, सांडपाणी नियोजन, नियमित फायर ऑडिट, बेसमेंटचे योग्य नियोजन करून बांधकाम व्यावसायिकांनी महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन केले.

यावेळी मुद्रांक जिल्हाधिकारी कैलास दवंगे यांनी नाशिक जिल्ह्याचा महसूल 2022 मध्ये 1064 कोटी असून यामध्ये क्रेडाई सदस्यांचे मोलाचे योगदान आहे. नोंदणी प्रक्रिया सुलभ होण्यासाठी शासन विविध उपायोजना करत असून नुकताच बांधकाम व्यावसायिकांच्या कार्यालयातूनच नोंदणी करण्याचा उपक्रमात शहरात असलेली 50 सदनिकांची अट ही नाशिककरता शिथिल करून ती 20 सदनिका असणार्‍यांनासुद्धा लागू करण्यात येणार असल्याचे सांगितले.

यावेळी क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष रवी महाजन यांनी नाशिकचे ब्रँडिंग होण्यासाठी देशातील सर्वोत्तम ठरेल असे एक्सलन्स सेंटर नाशिकमध्ये क्रेडाईतर्फे उभारले जात असल्याचे सांगितले. शहराच्या विकासासाठी व्यावसायिक मालमत्तेवरील घरपट्टीच्या दरात कपात करण्याची आग्रही मागणीदेखील त्यांनी केली. आगामी कुंभमेळ्याच्या दृष्टीने महापालिकेने पावले उचलावीत.

क्रेडाई नाशिक मेट्रो ‘व्हिजन डॉक्युमेंट’ तयार करत असून यामध्ये गोदावरीच्या पुराचे नियोजन, बफर डॅमची निर्मिती, आऊटर रिंगरोड, झोपडपट्टीविरहित शहर अशा अनेक बाबींचा समावेश असेल. यासाठी अद्ययावत कन्व्हेन्शन सेंटर उभारावे व वॉकिंग हॅपिनेस इंडेक्ससाठी नाशिकमध्ये काम व्हावे, अशी अपेक्षा क्रेडाईचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अनंत राजेगावकर यांनी व्यक्त केली. क्रेडाई महाराष्ट्रचे सचिव सुनील कोतवाल यांनी 2030 पर्यंत शहराचा विकास योजनाबद्ध, शाश्वत आणि नाशिकच्या मूळपणास अनुसरून असावा. यासाठी क्रेडाईने ‘मी जबाबदार नाशिककर’ ही भूमिका घेण्याचे ठरवले असल्याचे सांगितले. या बैठकीत क्रेडाई नाशिक मेट्रोचे मानद सचिव गौरव ठक्कर यांनी इतिवृत्ताचे वाचन केले. सूत्रसंचालन सचिन बागड यांनी केले तर आभार सहसचिव अनिल आहेर यांनी मानले.

24 ते 27 नोव्हेंबरला शेल्टर प्रदर्शन

क्रेडाईतर्फे घरांचे पर्याय एका जागेवर देणारा गृहप्रदर्शन ‘शेल्टर’ चे आयोजन 24 ते 27 नोव्हेंबरदरम्यान डोंगरे वसतिगृह मैदानावर करण्यात आले असल्याची घोषणा अध्यक्ष रवी महाजन यांनी केली. या प्रदर्शनासाठी समन्वयक म्हणून क्रेडाई नाशिक मेट्रोचे उपाध्यक्ष कृणाल पाटील यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com