कोविड सेंटर
कोविड सेंटर
नाशिक

हॉटेल ज्युपिटर येथे जुपिटर कोवीड सेंटरची निर्मिती; भुजबळ यांच्याकडून पाहणी

एकूण १०० बेड्सची व्यवस्था

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक । Nashik

नाशिक शहरामध्ये वाढत असलेला करोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आणि करोना बाधित रुग्णांवर तज्ञ डॉक्टरांकडून उपचार करण्यासाठी शहरात नव्याने हॉटेल ज्युपिटर (Hotel Jupitar) येथे जुपिटर कोवीड सेंटरची निर्मिती करण्यात आली आहे. या कोविड केअर सेंटरची पाहणी जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ (chhagan Bhujabal) यांनी केली.

यावेळी त्यांच्यासमवेत माजी खासदार समीर भुजबळ, मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे, आरोग्यधिकारी डॉ.त्रंबके, महापालिका नोडल ऑफिसर डॉ.आवेश पलोड, डॉ अभिनंदन जाधव, डॉ. गौतम गांगुर्डे, डॉ.स्वप्नील महाले, कैलास मुदलियार उपस्थित होते.

यावेळी छगन भुजबळ यांनी या कोविड केअर सेंटरची (Covid Center) पाहणी करून करोना बाधित रुग्णांवर कमी वेळात योग्य उपचार पद्धती राबवून रुग्णाला लवकर करोनामुक्त करण्यासाठी प्रयत्न करावे अशा सूचना देत शासन स्तरावर योग्य ते सहकार्य करणार असल्याचेही भुजबळ म्हणाले. तसेच शासनाने सुचविलेल्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यात यावे असे आदेशही संबंधित यंत्रणेला दिले आहेत.

नाशिक मधील वैद्यकीय क्षेत्रात अल्पावधीतच सकारात्मक ओळख निर्माण केलेल्या न्यु रिदम हॉस्पिटल यांच्या पुढाकारातून डॉ. अभिनंदन जाधव, डॉ. स्वप्नील महाले आणि डॉ. गौतम गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली जुपिटर कोविड सेंटर कार्यान्वित झाले आहे. ज्युपिटर कोविड केअर सेंटरमध्ये एखाद्या खाजगी रुग्णालयात प्रमाणेच या ज्युपिटर कोविड सेंटरमध्ये अद्ययावत सुसज्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या ज्युपिटर कोविड सेंटरमध्ये यामध्ये एकूण १०० बेड्सची व्यवस्था असून हे कोविड सेंटर फोर स्टार फॅसिलिटीने परिपूर्ण असणार आहे.

यामध्ये रुग्णांना सरकारी मार्गदर्शक तत्त्वानुसार तीन वेळा सात्विक जेवण, आयुष मंत्रालयाच्या सूचनेनुसार प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी औषधांची व्यवस्था, २० ऑक्सिजन बेड्स, ४ व्हेंटिलेटर यांसह ४० तज्ञ डॉक्टरांची टीम २४ तास कार्यरत राहणार आहे. त्याचबरोबर नर्सेस, वॉर्ड बॉय आणि इतर कर्मचारी हे सर्व प्रशिक्षित असून करोना बाधित रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेणार आहेत.

या खाजगी कोविड सेंटरमध्ये रुग्णांचे मानसिक आरोग्य सुदृढ राहावे यासाठी रोज सकाळी योगासने घेतली जाणार आहे, त्याचबरोबर हास्यक्लब, रुग्णांच्या विरंगुळ्यासाठी चेस, कॅरम, दूरदर्शन संच, मोबाईलवर वायफाय सुविधा आणि विशेष म्हणजे नातेवाईकांशी संपर्क साधण्यासाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. जुपिटर कोविड सेंटर हे खाजगी असले तरी सरकारने ठरवून दिलेल्या शासकीय दरानुसार कोरोना बाधित रुग्णांवर अत्यंत वाजवी दरात उपचार इथं उपलब्ध असणार आहे असल्याची माहिती डॉ.अभिनंदन जाधव व त्यांच्या टिमकडून देण्यात आली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com