
नाशिक । प्रतिनिधी Nashik
भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा आपली सत्ता टिकवण्यासाठी दुसरा पक्ष फोडून युती केली आहे. अशा परिस्थितीत सरकारला सत्तेतून खाली खेचा, महाराष्ट्र वाचवा, अशी मोहीम राज्यभर राबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय भारतीय कम्युनिस्ट पक्षाने घेतला आहे.
राज्यातील गंभीर राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची तातडीची ऑनलाईन बैठक झाली. राज्य सचिव मंडळ सदस्य कॉ. प्रकाश रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली व राष्ट्रीय सचिव मंडळ सदस्य कॉ. डॉ. भालचंद्र कानगो यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
कॉ. सुभाष लांडे यांनी प्रास्ताविक करून राज्यातील घडामोडींची विस्तृत माहिती दिली. बैठकीला राजू देसले, कॉ. प्रा. राम बाहेती, तुकाराम भस्मे, नामदेवराव चव्हाण, स्मिता पानसरे, सुकुमार दामले, शाम काळे, कॉ. शिवकुमार गणवीर, मिलिंद रानडे, प्रकाश नार्वेकर, अभय टाकसाळ, लता भिसे, हिरालाल परदेशी, महादेव खुडे, हौसलाल रहांगडाले, अरविंद जक्का, कॉ. अशोक सोनारकर व अशोक सूर्यवंशी हे कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.
28 ते 30 जुलैला मुंबईत बैठक
भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या राज्य कार्यकारिणीने घेतलेल्या निर्णयांच्या पार्श्वभूमीवर येत्या 28 ते 30 जुलैदरम्यान भाकपच्या राज्य कौन्सिलची बैठक मुंबईत होणार आहे. महाराष्ट्रातील गायरान जमीनधारकांना जमिनीतून हुसकावून लावण्याचे व कार्पोरेट घराण्यांना त्या जमिनी देण्याचे षडयंत्र, शेतकर्यांचा थकीत पीकविमा व नुकसानभरपाई, बोगस खते व बियाणे, शिक्षणाची झालेली हेळसांड, शिक्षक व प्राध्यापकांच्या हजारो रिक्त जागा, वाढती बेरोजगारी व महागाई, तिरंगा झेंड्याला व संविधानाला मानू नका, अशी संभाजी भिडे सारख्यांकडून उघडपणे केली जाणारी विधाने, वाढलेले जातीय अत्याचार व धार्मिक ध्रुवीकरण याविरोधात भारतीय कम्युनिस्ट पक्षाने राज्यभर आंदोलन करण्याचाही निर्णय घेतला आहे.