नाशकात शंभर बेडचे कोवीड हॉस्पिटल कार्यान्वित होणार

महापौर सतीश कुलकर्णी यांची माहिती
नाशकात शंभर बेडचे कोवीड हॉस्पिटल कार्यान्वित होणार

नाशिक । Nashik
करोना संसर्गाची भविष्यात येणारी तिसरी लाट लक्षात घेता महापौर सतीश नाना कुलकर्णी यांनी आज दिनांक 03 मे 2021 रोजी नेहरूनगर येथील इंडिया सेक्युरिटी प्रेस हॉस्पिटलचा आयुक्तसह पाहणी दौरा केला.

सदरच्या पाहणी दौर्‍यापूर्वी खा. भारती पवार, आ.सीमा हिरे, राहूल ढिकले, शहराध्यक्ष भाजपा गिरीष पालवे, सभागृह नेते सतिश सोनवणे, गटनेते भाजप जगदीश पाटील, माजी उपमहापौर अ‍ॅड.मनिष बस्ते, गुलाम शेख, प्रशांत जाधव, माजी सदस्य अ‍ॅड.तानाजी जायभावे, गणेश उन्हवणे, जगदीश गोडसे यांचेसह माननीय आयुक्त यांचे दालनात झालेल्या चर्चेनुसार कोरोनाची संभाव्य तिसरी लाट येण्याची शक्यता लक्षात घेता पुर्वतयारी म्हणून इंडिया सिक्युरिटी प्रेसचे नेहरूनगर येथील हॉस्पिटल हे कोविड हॉस्पिटल म्हणून कार्यान्वित करणेबाबत चर्चा झाली.

त्यानुसार दुपारी माननीय महापौर सतीश नाना कुलकर्णी यांनी माननीय आयुक्त यांच्यासमवेत पदाधिकार्‍यांसह हॉस्पिटलची समक्ष पाहणीही करणेत आली.
इंडिया सिक्युरिटी प्रेसचे हॉस्पिटल हे पूर्ण क्षमतेने कार्यान्वित नसून प्राथमिक सुधारणा म्हणजेच इमारतीस डागडुजी, रंगरंगोटी, स्वच्छता, इ. महानगरपालिकेच्या माध्यमातून केल्यास त्याठिकाणी किमान 100 बेडचे कोविड हॉस्पिटल तयार होऊ शकते असे महापौरांनी सांगितले.


शहरातील बिटको, झाकीर हुसेन हॉस्पिटल ,सिव्हील हॉस्पिटल ,मविप्र चे हॉस्पिटल व्यतिरीक्त रुग्णांच्या सेवेसाठी हे हॉस्पिटल तयार झाल्यास शहरातील रुग्णांना जीवनदायी ठरणार असल्याचेही ते म्हणाले.


शासनाने जाहीर केल्याप्रमाणे तिसरी लाट येणार असून ती मोठया प्रमाणात घातक असल्याने नाशिक शहरातील संभाव्य वाढणारी रुग्णसंख्या लक्षात घेता पुर्वतयारी म्हणून आरोग्यसेवा सक्षमप्रकारे देण्याकरिता सदर हॉस्पिटलकरीता आवश्यक असलेल्या दुरुस्त्या करुन प्राथमिक सोयी-सुविधांसह सदरचे हॉस्पिटल कोविड हॉस्पिटल म्हणून कार्यान्वित करणेकरीता तातडीने कार्यवाही करणेकरीता लागलीच यासंदर्भात महापौर सतीश नाना कुलकर्णी यांनी आयुक्त यांना तसे लेखी पत्राद्वारे कळविले असल्याने शहरात लवकरच नव्याने 100 बेडचे हॉस्पिटल रुग्णांकरिता उपलब्ध होणार असल्याचे सूतोवाच महापौरांनी केले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com