पंचवटीतील कोविड सेंटर कार्यान्वित होणार

पंचवटीतील कोविड सेंटर कार्यान्वित होणार

पंचवटी । वार्ताहर

करोनाच्या दुसर्‍या लाटेने राज्यभर हाहाकार पसरला असून, सद्यस्थितीत राज्य शासनाने राज्यभरात ‘ब्रेक दि चेन’ अंतर्गत मिनी लॉकडाऊन घोषित केला आहे. नाशिक शहरात देखील दिवसागणिक करोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असल्याने, सर्वत्र बेड शिल्लक नसल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पंचवटीतील हिरावाडी परिसरातील स्व. मीनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुलात 170 बेडचे कोविड सेंटर उभारले जात आहे.

गतवर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन घोषित करत करोना विरुद्ध देशात मोठा लढा सुरू केला. आठ- नऊ महिन्यांच्या कालावधीनंतर जनजीवन हळूहळू पूर्वपदावर आल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळाले. यानंतर चालू वर्षी पुन्हा एकदा करोनाने हळूहळू आपले हात पाय पसरायला सुरवात केली. नाशिक शहरासह जिल्ह्यातील करोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत गेले.

अलीकडच्या काळात गत वर्षीच्या तुलनेत दुपटीने रुग्णसंख्या वाढत आहे. शहरातील खासगी रुग्णालयात करोना रुग्णांना बेड मिळत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. यातही ऑक्सिजन बेडची कमतरता असल्याने करोना रुग्णांची मोठी परवड होत आहे. अशा परिस्थितीत माजी खासदार समीर भुजबळ, भुजबळ फाउंडेशन व शहर राष्ट्रवादी यांच्या संयुक्त विद्यमाने पंचवटीतील हिरावाडी परिसरातील स्व. मीनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुलात 170 ऑक्सिजन बेडचे कोविड सेंटर उभारले जात आहे.

याठिकाणी सध्या युद्धपातळीवर काम सुरू आहे. आगामी पाच ते सहा दिवसांत हे कोविड सेंटर कार्यान्वित होणार असल्याची माहिती यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कैलास मुदलियार यांनी दिली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com