कोविड केअर सेंटर सुरू

नांदगाव ग्रामीण रुग्णालय येथे १२ खाटांचे कोविड सेंटर सुरु
कोविड केअर सेंटर सुरू

नांदगाव। प्रतिनिधी Nandgaon

पालकमंत्री छगन भुजबळ यांनी मनमाड येथे घेतलेल्या आढावा बैठकीत नांदगाव तालुक्यात कोरोना बाधित रुग्ण संख्या वाढत असल्याने तालुक्याच्या ठिकाणी कोविड सेंटर सुरू करण्यात येईल अशी घोषणा केली होती. त्यावर तात्काळ कार्यवाही होऊन नांदगाव ग्रामीण रुग्णालय येथे कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे.

नांदगाव येथील कोविड सेंटर मध्ये १२ बेडची व्यवस्था करण्यात आली आहे.या ठिकाणी मध्यम प्रकारची लक्षणे असलेल्या रुग्णांवर उपचार करण्यात येणार आहे. सारताळे येथे सौम्य स्वरूपाची लक्षणे असलेल्या रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत. अतिगंभीर रुग्णांवर नाशिक येथील शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येणार आहेत.

याठिकाणी आजरोजी दहा कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू असून नांदगाव ग्रामीण रुग्णालयात सध्या 12 बेड्सची व्यवस्था करण्यात आली आहे. काही दिवसांनी बेडची संख्या वाढवून 30 पर्यंत करण्यात येणार आहे. सारताळे येथील कोविड सेंटर सुरू असणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. रोहन बोरसे यांनी दै.देशदुतशी बोलताना सांगितले.

नांदगाव शहरात एकूूण कोरोना बाधितांची संख्या 31 असून नांदगाव तालुक्यातील ग्रामीण भागात 57 रुग्ण आढळून आले आहेत. नांदगाव तालुक्यात 432 कोरोना बाधित रूग्ण बरे होऊन घरी परतले असून 21 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ. अशोक ससाणे यांनी सांगितले.

नांदगाव शहरात ग्रामीण भागातून बाजारपेठेत खरेदी करण्यासाठी गर्दी होत आहे.शहरातील बाजारपेठत नागरिकांनी सामाजिक अंतर आणि तोंडाला मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात

यावी,अशी मागणी जोर धरू लागली आहे. नागरिकांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची जबाबदारी आहे.आपल्या बेजबाबदार वागणुकीमुळे कोरोना वाढणार नाही, याची काळजी जनतेला घ्यावी लागणार आहे. त्यामुळे येत्या काळात जनतेकडून अधिक जबाबदारीच्या वागणुकीची अपेक्षा आहे.

नांदगाव शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच शासनाच्या नवीन नियमानुसार घरूनच उपचार घेत असलेले काही प्रतिष्ठित रुग्ण शहरांमध्ये खरेदीसाठी बाजारपेठेत फिरतांना दिसून येत आहेत.यामुळे शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही यामुळे प्रशासनाने वेळीच या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष घालून त्वरित उपाययोजना करणे गरजेचे आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com