मरण झाले स्वस्त..., उपचार झाले महाग

दिंडोरी शहरात कोविड सेंटर गरजेचे
मरण झाले स्वस्त..., उपचार झाले महाग

दिंडोरी । नितीन गांगुर्डे

दिंडोरी शहरात आणि तालुक्यात करोनाचा उद्रेक जाणवत असुन मरण झाले स्वस्त अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. केवळ दु: ख आणि दु:खच नातेवाईकांच्या वाटेला येत असुन कुणाकडे दाद मागावी असा प्रश्न पडलेला आहे.

दिंडोरी शहरात आणि तालूक्यात आता करोनाचा उद्रेक पहायला मिळत आहे. आरोग्य यंत्रणा किती गरजेची आहे हे करोनाने दाखवुन दिले आहे. दिंडोरी शहरात गेल्या तीन चार दिवसात काही मृत्यू झाले. पण या मृत्यूंंनी आपले आणि परक्यातील फरकही जाणवुन दिला पण वेळेवर रुग्णांना उपचार देऊ शकले नाही ही खंतही नातेवाईकांच्या मनात राहिली. एका तरुण युवकाला रुग्णवाहिका मिळाली नाही.

एका अवनखेडच्या रुग्णाला सिव्हील हॉस्पिटलमध्ये आणि खाजगी रुग्णालयातही जागा मिळाली नाही. एका रुग्णाला तीन ते चार तास कोविड सेंटरच्या बाहेरच थांबावे लागले. अहिवतवाडीच्या रुग्णाला उपचारासाठी आणले तर त्याचा पायरीवरच जीव गेला. सरळ त्याचे प्रेतच घरी न्यावे लागले. रविराज सोनवणे यांनी सर्व लोकप्रतिनिधी, शासकिय अधिकारी यांच्याशी सपर्क केला पण तत्पुर्वीच रुग्णाचे प्राण गेले.

सर्व आकाडतांडव करुनही हाती काही लागले नाही. सर्वांचे मृत्युचे कारण केवळ करोनाच आहे असे नाही पण सर्वांच्या मृत्युभोवती करोनाचाच संशय कल्लोळ दिसुन आला. करोनाची दहशतच इतकी आहे की कुणी रुग्णाच्या जवळही जात नाही. रेमडीसिवर औषधांचा काळाबाजार झाला आणि खाजगी डॉक्टरांनी तर जबाबदारी रुग्णाच्या नातेवाईकांवरच सोपवली.

करोना काळात कोणत्याही शहाण्या व्यक्तिला काय करावे हे सुचत नाहीये अशी हतबलता आहे. नाशिकचे सर्व हॉस्पिटल भरलेले आहे. सिव्हीलला बेड मिळत नाही.108 रुग्णवाहिका सेवेला भ्रमणध्वनी केला तर हॉस्पिटलला बेड असेल तर सेवा मिळेल हे उत्तर मिळत आहे. करोनाची ही साखळी जर आता तुटली नाही तर मृत्युंचे भयानक तांडव बघायला मिळु शकते. त्यामुळे सर्वांनी लॉकडाऊन काटेकोरपणे पाळणे गरजेचे आहे.

दिंडोरी शहरात कोविड सेंटर गरजेचे

दिंडोरी शहरात कोविड सेंटर होणे गरजेचे असुन याकामी सर्वच लोकप्रतिनिधी कमी पडत आहे. दिंडोरी हे तालूक्याचे मध्यवर्ती ठिकाण असुन येथे कोणत्याही गावातील रुग्ण उपचारासाठी धाव घेतो. परंतु येथे कोविड रुग्णाला उपचार मिळत नसल्याने सर्वांनाच इकडे तिकडे धावावे लागते.

कोविड सेंटर जर उभे राहिले तर तालूक्यातील जनतेची फार मोठी गरज भागवल्या जाणार आहे. दिंडोेरी शहरात सध्या अ‍ॅक्टिव्ह लोकप्रतिनिधी, नगरसेवक यांची गरज आहे. कारण केवळ रस्ते, गटारी, सभामंडपे यावर खर्च न करता जर नगरपंचायतीचे रुग्णालय उभे राहिले असते तर आज फार मोठी समस्या दुर झाली असती.

कामाच्या माणसांना निवडून न देता नात्यागोत्याचे राजकारण आणि जातीयतेचे राजकारण करणारे अनेक नेते सामान्य रुग्णांपासून दुर दिसत आहे हे जनतेने लक्षात ठेवावे. अजुनही वेळ गेलेली नसल्याने सर्वच लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन अधिकार्‍यांना पाठपुरावा करण्यास भाग पाडावे.दिंडोरी शहरात किमान ग्रामीण जनतेच्या सोयीसाठी कोविड सेंटर उभे करावे अशी मागणी आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com