सिन्नर । Sinnar

शहरासह तालुक्यात करोना बाधीतांची संख्या दररोजच वाढत आहे. रुग्णालयांमध्ये खाटाच उपलब्ध नसल्याने अनेक रुग्णांना रुग्णालयाबाहेर थांबून आपला नंबर लागण्यासाठी वाट पाहण्याची वेळ आली आहे.

उपजिल्हा रुग्णालयात कोवीड हेल्थ सेंटर व केअर सेंटर असून तेथे केवळ 30 रुग्णांना ऑक्सीजन देण्याची व्यवस्था आहे. याशिवाय केवळ औषधोपचारासाठी अजून जास्तीत जास्त 70 रुग्ण तेथे दाखल करता येऊ शकतात. मात्र, सध्या तेथे 125 च्यापूढे रुग्ण दाखल आहेत.

तिच अवस्था रतन इंडियाच्या विश्रामगृहात सुरु करण्यात आलेल्या कोवीड केअर सेंटरची आहे. तेथेही 100 च्यावर रुग्ण दाखल आहेत. त्यात रोजच 25 ते 40 नवे रुग्ण तालुक्यात आढळत असून त्यांच्यासाठी बेड उपलब्ध नसल्याने अनेक रुग्णांना रुग्णालयाबाहेर तास न् तास रुग्णवाहिकेतच बसून राहण्याची वेळ येत आहे.

रुग्णालयातून बरे होऊन रुग्ण बाहेर पडले तरच या नव्या रुग्णांना बेड उपलब्ध होत आहेत. शहरात तर अनेक रुग्ण बाधीत असल्याचा अहवाल आल्यानंतर तीन-तीन दिवस त्यांच्यापर्यंत आरोग्य विभागाचे कुणीही पोहचत नाही. त्यामुळे कुठलेही उपचार न घेता घरातच थांबून राहण्याची वेळ त्यांच्यावर येत आहे.

सध्या अस्तित्वात असणारी रुग्णालये कमी पडू लागल्याने तातडीने अजून एखादे कोवीड केअर सेंटर सुरु करण्याची मागणी होत आहे.