७२ शाळांमध्ये कोविड सेंटर सुरूच

शाळा सुरू करण्यात अडचणी
७२ शाळांमध्ये कोविड सेंटर सुरूच

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्ह्यातील काही शाळांमध्ये कोविडकाळात रुग्ण व्यवस्थेसाठी शासनाने कोविड सेंटर सुरू केले. आता करोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून शाळा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र जिल्ह्यातील 72 शाळांमध्ये अजूनही कोविड सेंटर सुरू आहेत. त्यामुळे या शाळा अजूनही मुख्याध्यापकांकडे सुपूर्द करण्यात आलेल्या नाहीत.

शासनाने कोविडचा रुग्ण नसलेल्या गावांत शाळा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे ज्या शाळांत कोविड सेंटर सुरू करण्यात आले होते अशा शाळांतील कोविड सेंटर जिल्हा प्रशासनाने बंद करावेत, अशी मागणी नाशिक जिल्हा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाने जिल्हा परिषद प्रशासनाकडे केली आहे.

नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव एस. बी. देशमुख, के. ए. गवळी, आर. टी. जाधव या पदाधिकार्‍यांनी जि. प.चे प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद पिंगळे यांची भेट घेतली. जिल्ह्यातील सर्व कोविड सेंटर बंद करण्यात यावेत, अशी मागणी केली.

कोविड सेंटर सुरू करण्यासाठी ताब्यात घेतलेल्या शाळांच्या इमारती अद्यापही जिल्हा प्रशासनाच्या ताब्यात आहेत. शाळा सुरू करण्यासाठी कमी कालावधी शिल्लक राहिलेला आहे. जिल्हा प्रशासनाने ज्या शाळांत कोविड सेंटर सुरू केले होते त्या शाळांच्या इमारती शाळा सुरू करण्याच्या तारखेपूर्वीच पूर्णतः निर्जंतूक करून संबंधित शाळा प्रमुखांच्या ताब्यात द्याव्यात. प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्यावर जिल्हा प्रशासनाने आरोग्य पथकाच्या माध्यमातून कोविड सेंटर म्हणून वापर झालेल्या शाळांची पुन्हा एकदा तपासणी करावी, अशी मागणीही जिल्हा मुख्याध्यापक संघाने केली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com