नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्हा आरोग्य विभागाने ग्रामीण भागात झपाट्याने वाढत असलेल्या करोना रुग्णांची संख्या पाहता प्रत्येक तालुक्यात कोविड केअर सेंटर सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.याबरोबरच करोना टेस्टची संख्याही वाढविण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील 870 करोना रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीला दोन हजार 321 रुग्ण करोनावर उपचार घेत आहेत. तसेच 36 हजार 841 रुग्ण उपचार घेऊन घरी पोहोचले आहेत. मार्च महिन्यात करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने त्यांच्यावर उपचार करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयांमध्ये जागा अपूर्ण पडत आहे. त्यामुळे नांदगाव येथे 100 खाटांचे होस्टेल कोविड केअर सेंटर (सीसीसी) म्हणून घेण्यात आले आहे.

येवल्यातही आश्रमशाळा ‘सीसीसी’ म्हणून घेण्यात येत असून, निफाडमध्ये दोन सेंटरमध्ये करोना रुग्णांवर उपचार केले जात आहेत. जिल्ह्यात निफाड तालुक्यात सर्वाधिक करोना मृत्यूदर आहे. येथे आजपर्यंत 157 नागरीकांचा मृत्यू झाला. तसेच सिन्नरमध्ये 122, नाशिक तालुक्यात 105, येवला 63, बागलाण 63, मालेगाव 79 व्यक्तिंचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.ग्रामीण भागात दिवसाला सुमारे 250 रुग्ण आढळत असल्याने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कपिल आहेर यांनी नांदगाव, येवला, चांदवड येथील ग्रामीण रुग्णालयांना भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. येथील करोना टेस्टची संख्याही वाढवण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. तसेच आवश्यकता वाटल्यास कोविड केअर सेंटरची संख्याही वाढवण्याच्या सूचना केल्या आहेत.

करोना रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी टेस्टची संख्या वाढवली आहे. रुग्णाच्या सानिध्यातील सुमारे 30 व्यक्तिंचे स्वॅब घेतले जातील. तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यास त्यांच्यावर उपचार करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या आहेत. त्यादृष्टिने कोविड केअरची संख्याही वाढवण्यात येत आहेत. प्रत्येक तालुक्यात रुग्णसंख्येनिहाय सेंटर वाढवले जात आहेत. येवला, नांदगावला प्रत्येकी एक तर निफाडला दोन सेंटर वाढवले आहेत.

- डॉ.कपिल आहेर,जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद