सावाना पदाधिकार्‍यांना न्यायालयाचा दिलासा

सावाना पदाधिकार्‍यांना न्यायालयाचा दिलासा

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

सार्वजनिक वाचनालयाच्या (Public Libraries) विद्यमान चार पदाधिकार्‍यांविरुध्द धर्मादाय आयुक्तांकडे दाखल केलेली तक्रार आयुक्तांनी फेटाळून लावली आहे.

त्यामुळे जयप्रकाश जातेगावकर (Jaiprakash Jategaonkar), अभिजित बगदे, देवदत्त जोशी, गिरीश नातू यांच्या मागे लागलेले न्यायालयीन शुक्लकाष्ट संपले आहे. यापुढे तरी सावानातील वाद चार भितींच्या आड सोडवून न्यायालयात जाण्याचे उद्योग बंद करावेत, अशी अपेक्षा अध्यक्ष प्रा. दिलीप फडके यांनी व्यक्त केली आहे.

सन 2014 मध्ये श्रीकांत बेणी यांनी 2012 मधील सावाना (SAVANA) पदाधिकार्‍यांविरोधात धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार केली होती. महाराष्ट्र विश्वस्त संस्था अधिनियमाच्या कलम (Sections of the Maharashtra Trustees Act) ‘41 ड’नुसार काही बाबींची चौकशी करून संबंधित पदाधिकार्‍यांचे सभासदत्व रद्द करावे, अशी मागणी त्यांनी अर्जाद्वारे केली होती. सेवाकर मुदतीत न भरणे, अग्निशमन यंत्रणा (Fire fighting system) सज्ज न करणे, मनाई असताना वाचनालयात पाच हजार रुपयांहून अधिक रोख रक्कम शिल्लक ठेवणे अशा काही बाबींवर आक्षेप घेत बेणी यांनी तत्कालीन संपूर्ण कार्यकारी मंडळावर कारवाईची मागणी केली होती.

या खटल्याचे कामकाज सुरू असतानाच सावानाचे तत्कालीन अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर व उपाध्यक्ष किशोर पाठक यांचे निधन झाले. त्यांच्यासह अन्य काही नावे पुढे या खटल्यातून निरनिराळ्या कारणांनी वगळण्यात आली. तूर्त विद्यमान चार पदाधिकार्‍यांवर खटला सुरु होता. आज धर्मादाय सहआयुक्त टी. एस. अकाली यांनी बेणी यांचा अर्ज फेटाळून लावला.

सावाना पदाधिकार्‍यांकडून अ‍ॅड. अतुल गर्गे, तर दुसर्‍या बाजूने विद्यमान पदाधिकारी श्रीकांत बेणी यांनी खटल्याचे कामकाज पाहीले. या निकालाबाबत प्रा. फडके म्हणाले, ही सामाजिक संस्था आहे. काम करताना थोड्याफार त्रुटी राहू शकतात. त्यासाठी थेट न्ययालयाचे दरवाजे ठोठावणे योग्य नाही. त्यात वेळ पैसा खर्च होतो. संस्थेबद्दल नाहक संभ्रम निर्माण होतो. त्यामुळे या पुढेतरी याबाबत दक्षता घ्यावी.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com