जिल्हा न्यायालय
जिल्हा न्यायालय |digi
नाशिक

व्हर्च्युअल ई-कोर्ट माध्यमाद्वारे न्यायालयीन कामकाज सुरू

दिवाणी न्यायाधीश हिंगणे यांच्या उपक्रमाचे स्वागत

Gokul Pawar

Gokul Pawar

इगतपुरी । Igatpuri

नाशिक येथील ६ वे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश श्रीमती पी. बी. हिंगणे यांनी दिवाणी दाव्यांचे कामकाज हे व्हर्चुअल व्हिडीओ कान्फरन्स माध्यमाद्वारे सुरू केले आहे. त्यानुसार कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे वकीलांनी प्रत्यक्ष कोर्टात न येता त्यांचे घरातील कार्यालयातून केलेला तोंडी युक्तीवाद ऐकला. दिवाणी न्यायाधीश हिंगणे मॅडम यांनी व्हर्चुअल माध्यमाद्वारे दिवाणी कामकाजाचा प्रारंभ केल्यामुळे वकील आणि पक्षकारांनी स्वागत केले आहे.

अधिक माहिती अशी की, मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार नाशिकचे जिल्हा न्यायाधिश तथा ई-कमिटीचे अध्यक्ष यांनी व्हर्चुअल माध्यमाद्वारे वकिलांना कामकाज करण्यास परवानगी दिली. त्यानुसार नाशिक मनपाच्या आणि इतर एका प्रतिवादीविरुद्ध अँड. प्रशांत जोशी व अँड. गोपी तिडके यांनी रे. मु. न. २६५/२०२० हा दावा त्यांच्या पक्षकारांच्या मार्फत ई-फाइलिंग तंत्रज्ञानाद्वारे घरूनच दाखल केला होता. या दाव्यात तातडीने अंतरिम हुकूम घेणे आवश्यक होते. मात्र करोनामुळे वकिलांनी प्रत्यक्ष कोर्टात जाऊन युक्तिवाद करणे गर्दीच्या दृष्टीने अयोग्य ठरणार होते. त्यामुळे जिल्हा न्यायाधीश श्रीमती हिंगणे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स या व्हर्चुअल माध्यमाद्वारे वकिलांना घरच्या कार्यालयातुन युक्तिवाद करण्याची परवानगी दिली.

यामध्ये वादींचे एक वकील टागोरनगर येथील घरच्या कार्यालयात तर दुसरे सहकारी वकील सातपुर येथील घरच्या कार्यालयात उपस्थित होते. ह्यामध्ये वादी यांनी नाशिकरोड येथील घरातून मोबाईलद्वारे कामकाजात भाग घेतला. न्यायाधीश श्रीमती हिंगणे यांनी त्यांच्या कोर्ट दालनातुन वादीच्या वकीलांचा व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे तोंडी युक्तिवाद ऐकला. ह्याकामी न्यायालयाचे जिल्हा प्रबंधक महेंद्र मंडाले, डिस्ट्रिक्ट सिस्टीम अॅडमिनिस्ट्रेटर सागर गोमासे यांचे सहकार्य लाभले. अशा रितीने व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे नाशिकच्या दिवाणी न्यायालयाचे कामकाज सुरु झाले आहे. ह्या सुविधेमुळे जेष्ठ विधिज्ञ, वकील, पक्षकार यांनाही त्यांच्या घरून आणि कार्यालयातून कामकाज करता येणार आहे.

त्याचप्रमाणे पक्षकारांना कोणत्याही जिल्ह्यातून कोर्टात न येता आवश्यकतेप्रमाणे व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे न्यायालयीन कामकाजात वकीलांमार्फत भाग घेता येणार आहे. सध्याच्या भयाण कोरोना संकटात मुंबई उच्च न्यायालयाने अत्याधुनिक तंत्रज्ञान आधारित उचललेले क्रांतीकारी पाऊल असल्याने वकिलांनी स्वागत केले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com