सटाणा | प्रतिनिधी Satana

सटाणा नगर परिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी पदाचा राजीनामा दिल्याचे सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पालिकेच्या सोळा नगरसेवकांनी देखील राजीनामे नगराध्यक्ष मोरे यांच्याकडे दिले आहेत. या राजीनामा नाट्याचा शहरवासीयांना अर्थबोध होत नसल्याचे चित्र आहे.

पाच वर्षांपूर्वी नगरपरिषदेच्या निवडणुकीत सटाणा शहर विकास आघाडीच्या माध्यमातून लोकनियुक्त नगराध्यक्ष झालेल्या सुनील मोरे यांच्या कार्यकाळात शहरासाठी महत्त्वकांक्षी पुनद पाणीपुरवठा योजना मार्गी लागली.

इतर विकास कामांच्या प्रेझेटेंशनमध्ये आघाडीवर असलेल्या नगराध्यक्षांनी नुकताच राज्यपाल भगतसिंह कोशारी यांच्यासह इतर मंत्री महोदयांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित केलेला देवमामलेदार यशवंतराव महाराज स्मारक नूतनीकरण समारंभासाठी झालेल्या खर्चाच्या प्रकरणासह शहरातील विकासकामांबाबत काही नगरसेवकांनी केलेल्या तक्रारी अर्जांचा वाद असल्याची चर्चा आहे.

सद्यस्थितीत नगराध्यक्ष नॉटरीचेबल आहेत. दरम्यान, नगराध्यक्षांच्या दालनात आयोजित पत्रकार परिषदेत सोळा नागरसेवकांनी नगराध्यक्ष सुनील मोरे यांना पाठिंबा दर्शवित पदाचे राजीनामे देत असल्याचे जाहीर केले.

यात उपनगराध्यक्ष दीपक पाकळे, भाजपचे गटनेते महेश देवरे, शहर विकास आघाडी गटनेते राकेश खैरनार, काँग्रेस गटनेते दिनकर सोनवणे, विरोधी पक्षनेते नितीन सोनवणे, नगरसेविका रुपाली सोनवणे, निर्मला भदाणे, सुनीता मोरकर, बाळू बागुल, आशा भामरे, भारती सूर्यवंशी, सोनाली बैताडे, पुष्पा सूर्यवंशी, सुवर्णा नंदाळे, शमीम मुल्ला, मनोहर देवरे आदींचा समावेश आहे. यावेळी अनुपस्थित असलेल्या संगीता देवरे, शमा मन्सुरी, राहुल पाटील, मुन्ना शेख, सुरेखा बच्छाव, डॉ. विद्या सोनवणे आदी सहा नगरसेवकांची भूमिका गुलदस्त्यात आहे.

नगराध्यक्षांच्या राजीनाम्यासंदर्भात जिल्हाधिकारी अथवा सनपा मुख्याधिकारी यांच्यातर्फे अधिकृत दुजोरा प्राप्त झाला नाही. सोळा नगरसेवकांनी देखील प्रशासनाऐवजी नगराध्यक्षांकडे राजीनामे दिल्यामुळे एकुण घडामोडींबाबत शहरवासीयांमध्ये संभ्रम कायम आहे.