
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
नवीन नाशिकमधील (New Nashik) अश्विननगर येथील संभाजी स्टेडियम (Sambhaji Stadium) येथे भव्यदिव्य क्रीडांगण व इतर सुविधांच्या ६ कोटी रुपयांच्या विकासकामाची (Development Work) सुरुवात करून ३ वर्षांचा कालावधी लोटला आहे. मात्र, काम पूर्ण होत नसल्याने वास्तू दोष असल्याचे कारण करीत याठिकाणी नगरसेविकेने चक्क वास्तू पूजा करत बोकड बळी दिल्याची घटना समोर आली आहे...
याबाबत अधिक माहिती अशी की, संभाजी स्टेडियम येथे केंद्र शासनाच्या 'खेलो इंडिया खेलो' (Khelo India Khelo) या उपक्रमाअंतर्गत ६ कोटी रुपये खर्चून विकासकामे करण्यात येत होते. याचे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या हस्ते उद्धघाटन देखील करण्यात आले होते. त्यानंतर काम जलद गतीने पूर्ण होणे अपेक्षित असताना त्यात अनेक अडथळे निर्माण झाले.
सध्यस्थितीत काम पूर्णपणे थांबले आहे. या कामात अडथळे निर्माण होत आहेत. म्हणजेच येथे वास्तू दोष (Architectural Defects) असल्याचे कारण करीत येथील ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका किरण दराडे व त्यांचे पती बाळा दराडे यांनी या ठिकाणी वास्तू पूजेचे आयोजन केले होते. पुजेनंतर या ठिकाणी म्हसोबा महाराजांना प्रसाद म्हणून बोकड बळी देण्यात आला. त्यानंतर परिसरातील नागरिकांसाठी कारणाचे जेवण देण्यात आले. यावेळी शिवसेना उपविभागप्रमुख दीपक गामणे, शाखाप्रमुख आनंद घुगे, मॉन्टी बागुल, विक्रांत सांगळे आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.
स्टेडियमच्या विकासकामासाठी असे आले अडथळे
या कामासाठी तीन ठेकेदार काम करीत होते. त्यात एकाचा करोनात मृत्यू झाला, दुसऱ्याचा आजारपणामुळे मृत्यू झाला तर तिसरा आर्थिक नियोजनामुळे काम करण्यास असमर्थ ठरला आहे. ६ कोटींच्या कामात फक्त दीड कोटींचे काम करून पुढील काम थांबविण्यात आले आहे. तर मनपाच्या वतीने पुन्हा ३ कोटींचा निधी देण्यास मंजूरी मिळाली आहे. म्हणजे आता तब्बल ९ कोटी रुपये खर्चून राजे संभाजी स्टेडियमचा कायापालट होणार आहे.