प्रतिबंधित प्लास्टिक विरोधात मनपाची मोहीम

प्रतिबंधित प्लास्टिक विरोधात मनपाची मोहीम

नवीन नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक महानगरपालिकेतर्फे( NMC ) प्रतिबंधित प्लास्टिक वापराबद्दल ( restricted plastic use)नवीन नाशिक परिसरात प्रतिबंधात्मक कारवाईची मोहीम सुरु करण्यात आली आहे.

मनपा आयुक्त तथा प्रशासक रमेश पवार यांनी आदेशीत केलेप्रमाणे संचालक, घनकचरा व्यवस्थापन विभाग डॉ. आवेश पलोड, विभागीय अधिकारी डॉ. मयूर पाटील यांच्या सूचनेप्रमाणे नवीन नाशिक विभागामध्ये प्रतिबंधित प्लास्टिक विरोधात मोहीम राबविण्यात येत आहे. ही मोहीम विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविली जात आहे.

मागील आठ दिवसांपासून नवीन नाशिकमधील व्यापारी वर्ग व नागरिकांविरुद्ध प्रतिबंधित प्लास्टिक त्यामध्ये सिंगल युज प्लास्टिक व 75 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक कॅरिबॅग वापरलेबाबत दंडात्मक कारवाई करणेत येत आहे. नवीन नाशकातील पंडितनगर, उत्तमनगर, पवननगर, विजयनगर, त्रिमूर्ती चौक, उपेंद्र नगर, शिवाजी चौक आदी परिसरांत राबविली जात आहे.

नवीन नाशिक घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत (New Nashik Solid Waste Management Department) नागरिक व व्यावसायिक यांना आवाहन करणेत येते की, कोणीही प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर करू नये अन्यथा खालील नमूद केलेप्रमाणे कारवाईस सामोरे जावे लागेल प्रथम गुन्हा 5 हजार रुपये दंड, दुसरा गुन्हा 10हजार रुपये दंड, तिसरा गुन्हा 25 हजार रुपये दंड व 3 महिने कारावास अशी शिक्षेची तरतूद आहे, असे घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे कळविण्यात आले आहे.

ही मोहीम स्वच्छता निरीक्षक बी. आर. बागुल, आर. डी. मते, राजेश बोरीसा, दीपक बोडके, रावसाहेब रुपवते, जितेंद्र परमार तसेच स्वच्छता मुकादम विजय गोगलिया, राहुल गायकवाड, विशाल आवारे, अजय खळगे, दीपक लांडगे, अशोक दोंदे, राजाराम गायकर, विजय जाधव, सुनील राठोड, अजय सौदागर आदी राबवत आहे.

एका वर्षांत 10 लाख दंड वसूल

महापालिकेच्या वतीने प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी घातल्यानंतरही त्यांची सर्रास विक्री व वापर सुरू असल्याने गेल्या एप्रिल 2021 ते मार्च 2022 या वर्षभरात 192 जणांवर कारवाई करून 10 लाख 20 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

गेल्या वर्षभरात एप्रिलमध्ये 11 जणांवर कारवाई करण्यात येऊन 65 हजार, मे मध्ये 2 जणांवर कारवाई करण्यात येऊन 10 हजार, जूनमध्ये 9 जणांवर कारवाई करण्यात येऊन 65 हजार, जुलैमध्ये 9 जणांवर कारवाई करण्यात येऊन 45 हजार, ऑगस्टमध्ये 5 जणांवर कारवाई करण्यात येऊन 25 हजार, सप्टेंबरमध्ये 9 जणांवर कारवाई करण्यात येऊन 45 हजार, ऑक्टोबरमध्ये 27 जणांवर कारवाई करण्यात येऊन एक लाख 35 हजार, नोव्हेंबरमध्ये 14 जणांवर कारवाई करण्यात येऊन 70 हजार, डिसेंबरमध्ये 17 जणांवर कारवाई करण्यात येऊन 90 हजार, तर जानेवारी 2022 मध्ये 35 जणांवर कारवाई करून एक लाख 95 हजार, फेब्रुवारीत 16 जणांवर कारवाई करून 80 हजार, मार्चमध्ये 38 जणांवर कारवाई करून एक लाख 95 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

शासनाने प्लास्टिक वापरावर बंदी घातल्यानंतर महापालिकेने शहरात 75 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर करण्यांवर बंदी घातली आहे. तरीही कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे प्लास्टिक बंदीसाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती होण्याची गरज आहे. 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी असतानाही मार्केटमध्ये भाजीवाले, फळवाल्यांकडे, किराणा दुकानात या पिशव्या सर्रास उपलब्ध होतात. तेल, दूध सुटे घेताना उपलब्ध होणार्‍या पिशव्याही पातळ असतात. या पातळ पिशव्या रिसायकल होत नाहीत. त्यामुळे त्या गोळा केल्या जात नसल्याने हा कचरा साठत जातो. काही पर्यावरणप्रेमी, प्लास्टिकच्या पिशव्यांमुळे होणारी हाणी जाणवून जागरुक झालेले नागरिक प्लास्टिक बंदीसाठी प्रयत्न करत आहेत. मात्र हे प्रमाण फार कमी आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com