पाणीपट्टीसाठी मनपाचे अ‍ॅप

आयुक्तांसमोर सादरीकरणानंतर होणार सुरुवात
पाणीपट्टीसाठी मनपाचे अ‍ॅप

नाशिक । प्रतिनिधी Nashik

विविध प्रकारचे प्रयत्न करूनही नाशिक महापालिकेची ( NMC )पाणीपट्टीची ( Recovery Of Water Bills ) वसुली पाहिजे त्या प्रमाणात होत नाही. नाशिक शहर परिसरात 2 लाख 10 हजार नळ कनेक्शन आहेत, मात्र सर्वांकडूनच नियमित पाणीपट्टी बिले अदा करण्यात येत नसल्यामुळे थकबाकीची रक्कम कोट्यवधी रुपयांमध्ये गेली आहे. महापालिकेने आता विशेष अ‍ॅप ( Special App for Water Bill ) तयार केले आहे. या अ‍ॅपद्वारे थेट मोबाईल व्हॉटस्अ‍ॅपवर महापालिकेची पाणीपट्टी येणार आहे. या अ‍ॅपद्वारे ग्राहकांना आपले बिलदेखील भरता येणार आहे. महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक रमेश पवार यांच्याकडे लवकरच त्याचे सादरीकरण होऊन याची सुरुवात करण्यात येणार आहे.

या अ‍ॅपद्वारे नागरिकांना आपल्या पाणी मीटरचे स्वत:च रीडिंग घेऊन बिलाची मोजणी करता येणार असून व्हॉटस्अ‍ॅप, इ-मेलद्वारे नागरिकांना बिल प्राप्त होणार आहे. महापालिकेच्या माध्यमातून शहरात घरोघरी पाणीपुरवठा केला जातो. यासाठी तब्बल 2 लाख 10 हजार नळ कनेक्शन देण्यात आले आहेत. घरगुती नळ कनेक्शनधारकांना दर दोन महिन्यांनी तर व्यावसायिक नळ कनेक्शनधारकांना दर चार महिन्यांनी पाणीपट्टीची बिले दिली जाणे आवश्यक आहे.

259 चौरस किलोमीटर क्षेत्र असलेल्या नाशिक महापालिकेत कर विभागात फक्त 96 कर्मचारी आहेत. या कर्मचार्‍यांकडे पाणीपट्टीसह घरपट्टी वसुलीची जबाबदारीही आहे. अपुर्‍या कर्मचारी संख्येमुळे पाणीपट्टीची देयके वर्ष-वर्ष वाटप केली जात नाहीत. काही ग्राहकांना तर पाच ते सात वर्षे उलटली तरी पाणीपट्टीची देयके मिळू शकलेली नाहीत. देयके वेळेवर मिळत नसल्यामुळे एकाचवेळी दिल्या जाणार्‍या सरासरी बिलांमुळे वाढणारी पाणीपट्टीची रक्कम सर्वसामान्यांना भरणे परवडत नाही.

अ‍ॅप जीपीएस लिंक

नळ कनेक्शनधारकांनी पाणी मीटरचा फोटो काढून अ‍ॅपवर अपलोड केल्यास अ‍ॅपद्वारे तत्काळ पाणीपट्टीची मोजणी होऊन बिल मिळू शकणार आहे. त्याचबरोबर महापालिकेचे कर्मचारीदेखील या अ‍ॅपद्वारे बिलाची आकारणी करू शकतील. हे अ‍ॅप जीपीएस लिंक असणार असल्याने मीटर रीडिंगमध्ये घोटाळा होणार नाही.

अ‍ॅप पूर्णपणे तयार झाले असून महापालिकेचे आयुक्त रमेश जाधव यांच्यासमोर त्याचे सादरीकरण होणे बाकी आहे. सादरीकरण झाल्यावर तो पूर्ण क्षमतेने लागू करण्यात येणार आहे.

अर्चना तांबे, मनपा उपायुक्त

Archana Tambe, Municipal Corporation Deputy Commissioner

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com