थकबाकी वसुलीसाठी मनपाची अभय योजना

16 ऑगस्टपासून तीन टप्प्यात योजना लागू होणार
थकबाकी वसुलीसाठी मनपाची अभय योजना

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक महानगरपालिका ( Nashik Municipal Corporation )उत्पन्न वाढीसाठी विविध प्रकारचे प्रयत्न करीत आहे यामुळे घरपट्टी वसुलीच्या असा वसुलीसाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली असून दंडाच्या रकमेत तब्बल 90 टक्के पर्यंत सूट देण्यात येणार आहे. घरपट्टीच्या थकबाकी वसुलीसाठी महापालिकेने अभय योजना ( Abhay Yojana )आणली आहे. ती येत्या 16 ऑगस्टपासून तीन टप्प्यात योजना लागू होणार आहे.

महापालिका क्षेत्रातील सुमारे साडेचार लाख मिळकतींची नोंद आहे. करोनामुळे सर्वच व्यवहार ठप्प झाल्याने करदात्यांच्या आर्थिक परिस्थितीवरही परिणाम झाला. त्यामुळे गेल्या दीड वर्षांपासून महापालिकेच्या करवसुलीला मोठा फटका बसला आहे. साडेचार लाखांपैकी तब्बल 1 लाख 80 मिळकतधारक हे थकबाकीदार बनले आहेत. या थकबाकीदार मिळकतधारकांकडे महापालिकेची तब्बल 249 कोटी रुपयांची घरपट्टी थकीत आहे. घरपट्टी वसुलीकरीता वारंवार सूचना पत्रक, नोटीसा बजावून देखील थकबाकीदारांवर परिणाम होताना दिसत नाही. घरपट्टीच्या थबाकीदारांवर महापालिकेच्या माध्यमातून दरमहा दोन टक्के शास्ती लादली जाते.

कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून ही शास्ती आकारली गेलेली नाही. तरी देखील घरपट्टी थकबाकी भरण्याचे प्रमाण अल्प आहे. त्यामुळे थकबाकी वसुलीसाठी महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी थकबाकीदारांवर कारवाई न करता अभय योजना लागू करण्याचा दिलासादायक निर्णय घेतला आहे. त्यानुसार येत्या 16 ऑगस्टपासून अभय योजना थकबाकीदारांकरीता लागू केली जाणार आहे.

तीन टप्प्यात ही योजना असणार असून त्याअंतर्गत पहिल्या टप्प्यात दंड व नोटीस फीच्या रकमेत 90 टक्के, दुसर्‍या टप्प्यात 70 टक्के तर तिसर्‍या टप्प्यात 50 टक्के सूट दिली जाणार आहे. महापालिका क्षेत्रातील 1 लाख 80 हजार थकबाकीदारांकडे महापालिकेची तब्बल 249 कोटी रुपयांची घरपट्टी थकीत आहे. यामध्ये सुमारे 140 कोटी रुपये ही केवळ शास्ती अर्थात दंडाची रक्कम आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com