एमएससीआयटी केंद्र संचालकांवर उपासमारीची वेळ

विद्यार्थी संगणकीय शिक्षणापासून वंचित
एमएससीआयटी केंद्र संचालकांवर उपासमारीची वेळ
देशदूत न्यूज अपडेट

कळवण । Kalwan

आजच्या आधुनिक युगात संगणकाला अनन्य महत्त्व प्राप्त झाले असून देश पेपरलेस इंडिया म्हणून वाटचाल करीत आहे. सध्या करोनाच्या संसर्गाने आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक अशा सर्वच क्षेत्रावर घाला घातला आहे.

त्यातच शैक्षणिक क्षेत्रातील संगणक शिक्षणावरही याचा परिणाम दिसून आला आहे. याकाळात जिल्ह्यातील जवळपास 60 हजार विद्यार्थी संगणक शिक्षणाचे एमएससीआयटीचे प्रमाणपत्र परीक्षा देऊ शकले नाही व शिक्षणच बंद असल्याने शिक्षण घेऊही शकले नाही.

संबंधित प्रमाणपत्र सरकारी नोकरी करीतांना राज्य शासनाने अनिवार्य केले असून ज्या सरकारी कर्मचारी अजूनही एमएससीआयटी उत्तीर्ण होऊ शकले नाही. त्यांचीच संधी हुकली आहे. वास्तविक फिजिकल डिस्टंसिगचे पालन करून हे शिक्षण घेणे शक्य असतांनाही वर्षभरातील सात सत्राच्या शिक्षणाची मात्र हानी झाल्याने युवकांमध्ये नाराजी व्यक्त होत असून केंद्र संचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे.

एमकेसीएल मार्फत एमएससीआयटीचे ज्ञान संगणक प्रशिक्षण केंद्रातून दिले जाते. आता तर संगणकावरील टायपिंगही सुरू करण्यात आली आहे.त्यामुळे टायपिंग शिक्षण्याचे वय झालेल्या युवकांचे करोनामुळे टायपिंग हुकली आहे. त्यांना उशिराच आता की बोर्डवर बोटांच्या हालचाली करण्यावर लक्ष केंद्रित करावे लागणार आहे.

एकंदरीत बेरोजगार वाढवण्यास संगणकीय प्रशिक्षण केंद्र बंद असणे हे एक मोठे कारण ठरणार आहे. दरवर्षी किमान एमएससीआयटीचे सात सत्र होतात. मात्र दि.23 मार्च 2020 पासून संगणकीय ज्ञान देणार्‍या केंद्राची कवाडेच बंद झाली आहे. त्याचा परिणाम भविष्यात युवकांना जाणवणार आहे.

इयत्ता दहावी-बारावीच्या परीक्षेची चर्चा होते त्याच पध्दतीने या केंद्राच्या परीक्षेची ही आता चर्चा होऊ लागली आहे. शैक्षणिक वर्षात दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी घरीच बसून ऑनलाईन अभ्यास करीत असताना त्यांना संगणक प्रशिक्षणाचा जोड अभ्यासक्रम घरी बसून करता आला नाही. हे शैक्षणिक क्षेत्राला लाजिरवाणी बाब ठरली आहे. नाशिक जिल्ह्यात जवळपास 200 हुन अधिक संगणक प्रशिक्षण केंद्र आहे.

या केंद्रावर संगणक क्षेत्रातील विविध अभ्यासक्रम शिकवले जात असल्याने युवकांना अनेक ठिकाणी नोकर्‍या मिळतात. त्या करता दरवर्षी किमान 10 बॅच तरी होतात हे प्रशिक्षण बंद न पडणारे आहे. त्यामुळे कोणत्याही वयातील विद्यार्थी हे शिक्षण घेऊन मोकळे होतात.

शक्यतो दहावीनंतर हे शिक्षण घेण्यात अनेकांचा कल असतो. मात्र हे प्रशिक्षण केंद्र 23 मार्च 2020 पासून करोनाच्या संसर्गामुळे बंद आहे.शिक्षण बंद असल्याने युवकांचे मोठे नुकसान झाले आहे.

नाशिक जिल्ह्यात जवळपास 200 संगणक प्रशिक्षण केंद्र असून प्रत्येक केंद्रावर विविध अभ्यासक्रम शिकवले जातात त्यामुळे युवकांना अनेक ठिकाणी त्यातून नोकर्‍या सुद्धा मिळतात कोणत्याही वयातील विद्यार्थी हा संगणक प्रशिक्षण घेत असतो.

शक्यतो दहावीनंतर संगणक प्रशिक्षणाकडे विद्यार्थ्यांचा जास्त कल असतो. करोनाच्या संसर्गामुळे केंद्र बंद असल्यामुळे आतापर्यंत जवळपास दहा बॅचेचे नुकसान झाल्याने कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. तरी शासनाने केंद्र सुरू करण्याची त्वरीत परवानगी द्यावी.

- राकेश पगार, एमएससीआयटी, केंद्र संचालक, कळवण

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com