करोना मृत्यू पोलीस ठाण्यास कळवणे बंधनकारक

पोलीस आयुक्तांची नियमावली
करोना मृत्यू पोलीस ठाण्यास कळवणे बंधनकारक

नाशिक । Nashik

शहरात कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांकडून सबंधीत रूग्णालय तसेच डॉक्टरांवर हल्ले होण्याचे प्रकार वाढत आहेत. हे हल्ले टाळण्यासाठी पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी नियमावली जाहिर केली असून, यापुढे करोनामुळे रूग्णाचा मृत्यू झाल्यास संबंधित हॉस्पिटलने ती माहिती तात्काळ हद्दीतील पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकांना कळवणे बंधनकारक करण्यात आले आहे.

करोनाविरूद्धची लढाई तीव्र झालेली असताना रूग्णांच्या नातेवाईकांकडून थेट रूग्णालये आणि डॉक्टर्सवर हल्ले होत असल्याने वैद्यकीय क्षेत्रात भितीचे वातावरण आहे. शहरात करोना रूग्णांमध्ये प्रचंड संख्येने वाढ झाली. यामुळे सरकारी यंत्रणेसह खासगी रूग्णालयांची यंत्रणा कोलमोडली आहे. अनेक रूग्णांना आवश्यकता असतानाही ऑक्सीजन तसेच व्हेेंटिलेटर बेड उपलब्ध होत नाहीत.

यामुळे रूग्णांना आवश्यक उपचार मिळणे सहज शक्य होत नसल्याने रूग्णांचे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र, यामुळे डॉक्टर व रूग्णालयांना दोषी धरत रूग्णाच्या नातेवाईकांकडून वाद घातले जात आहेत. तसेच थेट रूग्णालये आणि डॉक्टर्सवर हल्ले होण्याचे प्रमाण वाढल आहेे. रोशन घाटे या तरूणाच्या मृत्यूनंतर सोमवारी (दि.26) रात्री मुंबई नाका भागातील मानवता क्युरी रूग्णालयावर 10 ते 12 जणांनी हल्ला चढविला होता.

याच दिवशी सातपूर भागातील कार्बन नाका आणि इंदिरानगर येथील डॉक्टरसह त्याच्या पत्नीवर हल्ला करण्यात झाला. तर बुधवारी रात्री नाशिकरोडच्या रेडीएन्ट या रूग्णालयात नातेवाईकांनी तोडफोड केली. या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्तांनी एक नियमावली जाहिर केली आहे.

यापुढे करोना रूग्णाचा मृत्यू झाल्यानंतर हॉस्पिटल प्रशासनाने लागलीच ही माहिती जवळच्या पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकांना कळवयाची आहे. यातून पुढील घटनांना पायबंद घालता येऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जाते आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com