देवळाली कॅम्प । वार्ताहर Devlali Camp

करोना महामारीच्या काळात मतदारसंघातील नागरिकांना अधिकाधिक चांगल्या दर्जाची वैद्यकीय सेवा देणे, उपचारांविषयीचे उत्तम व्यवस्थापन करण्यासाठी विशेष उपाययोजना करणार्या खासदारांच्या कामाचा गुणात्मक अहवाल दिल्ली येथील ‘गव्हर्न आय’ या संस्थेने जाहिर केला आहे. या सर्वेक्षणातून खा. हेमंत गोडसे यांचा देशात सहावा तर महाराष्ट्रात पहिला क्रमांक आला आहे.

खा. गोडसे यांच्या उत्तम कामगिरीचा लौकीक यानिमित्ताने अवघ्या देशभरात पोहचला आहे. करोनाकाळात खा. गोडसे यांनी दिलेल्या उत्तम सेवेची नोंद देशपातळीवर घेतल्याने जिल्हावासियांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. करोनाकाळात लोकप्रतिनिधींनी जनतेसाठी केलेली समाजपयोगी कामे सर्वाधिक लक्षवेधी ठरलेली आहे. देशभरात सर्वाधिक कोणकोणत्या खासदारांनी अहोरात्र कष्ट उपसले याचा सर्व्हे ‘गव्हर्न आय’ संस्थेच्या माध्यमातून गुप्त पद्धतीने करण्यात आला. यात खा. गोडसे यांना देशभरातील नागरिकांनी अधिकाधिक पसंती दिली आहे.

याबाबत ‘गव्हर्न आय’ संस्थेच्या प्रशासनाने दिलेली अधिक माहिती अशी की, या संस्थेतर्फे 24 मार्च ते 30 ऑक्टोबर 2020 या काळात देशभरातील खासदारांनी केलेल्या कामाचा सर्वे करण्यात आला. या कामासाठी संस्थेच्या संकेतस्थळावर विशेष नामांकन प्रक्रिया राबविण्यात आली. त्यातून प्रथम आलेल्या 50 खासदारांची निवड करण्यात आली. त्यानंतर संस्थेच्या विशेष पथकांनी गोपनिय पद्धतीने 50 खासदारांच्या मतदारसंघात जावून प्रत्यक्ष कोविड-19 झुंज देण्यासाठी उभारलेल्या उपाययोजनांची तसेच कामांची पाहणी करण्यात आली.

या 50 खासदारांमधून प्रथम पहिले 25 खासदारांची खास निवड करण्यात आली. त्यानंतर पथकांनी त्या-त्या मतदारसंघातील अधिकारी, लोकप्रतिनिधी, संस्था, सामाजिक संस्था, तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर नागरिकांशी प्रत्यक्ष संपर्क साधून संवाद साधला. त्यानंतर संस्थेने देशभरातील ‘टॉप 10’ ची घोषणा आज केली आहे. पहिल्या दहा खासदारांच्या यादीत केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचा देखील समावेश आहे. या सर्वेक्षणात खा. गोडसे यांना 66 तर 23 हजार 853 गुणांची विशेष पसंती दिली आहे. त्यामुळे नाशिक मतदारसंघात कोविड-19 काळात नागरिकांना अत्यावश्यक सेवा पुरविण्यात विशेष परिश्रम घेतले असल्याने नाशिकचा नावलौकीक देशात पोहचविला आहे.

कोविडकाळात मतदारसंघातील नागरिकांसाठी केलेल्या कामांची ही पावती आहे. केवळ नागरिकांनी केलेल्या सहकार्यामुळे हे शक्य झाले आहे. अजुनही करोनाचे संकट दूर झालेले नाही. प्रशासनाने दिलेल्या आदेशाचे नागरिकांनी पालन करणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहानानुसार हे सर्व शक्य झाले आहे.

खा. हेमंत गोडसे