करोनाची लस गावपातळीवर द्यावी; ग्रामीण भागातील नागरिकांची मागणी

करोनाची लस गावपातळीवर द्यावी; ग्रामीण भागातील नागरिकांची मागणी

लखमापूर । Lakhmapur (वार्ताहर)

दिंडोरी तालुक्यात सध्या करोनाने आपले उग्र रुप दाखविल्याने दिवसेंदिवस रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर दिसत आहे. त्यामुळे शासनाने गावापातळीवर करोनाची लस उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी ग्रामीण भागातील नागरिकांकडून होत आहे.

सध्या शासनाच्या नियमानुसार ज्या व्यक्तीचे वय 45 वर्षाच्या पुढे आहे, अशा व्यक्ती करोनाची लस घेत आहे. परंतु लस घेतांना ग्रामीण भागातील जनतेला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

करोनाची लस दिंडोरी, वणी, तळेगाव, वरखेडा आदी ठिकाणीच्या आरोग्य केंद्रात दिल्या जातात. यासाठी नागरिक सकाळपासूनच रागा लावून बसतात. एका दिवशी किती लसीकरणांचे उद्दिष्टे असते हे नागरिकांना माहिती राहात नसल्यामुळे नागरिक गर्दी करतात.

एका दिवसांचे लसीकरण उद्दिष्टे संपले की नागरिकांना विना लसीचे घरी परतावे लागते. परत दुसर्‍या दिवशी लसीकरणांसाठी आरोग्य केंद्रात जावे लागते. त्यामुळे वेळ जातो. अशा एक ना अनेक समस्यांना ग्रामीण भागातील नागरिकांना तोंड द्यावे लागते.

अशा समस्या दुर करण्यासाठी व नागरिकांची अडचण लक्षात घेऊन शासनाने गावांपातळीवर करोनाची लस उपलब्ध करून द्यावी, यासाठी प्रत्येक गावांसाठी आठवड्यातुन दोन किंवा तीन वार निश्चित करण्यात यावे. जेणेकरून ग्रामीण भागातील जनतेला वेगवेगळ्या समस्यांपासुन दुर राहात येईल.

लसीकरणांसाठी खाजगी रुग्णालयाला पसंती

सरकारी दवाखान्यात लवकर क्रमांक लावून ही लवकर क्रमांक लागत नाही. त्यामुळे अनेकांनी पैसे खर्च करून खाजगी रूग्णालयात करोनाची लसीकरणांचे डोस घेतले आहे. पैसे गेले तरी चालेल, परंतु गर्दीच्या ठिकाणांपासुन दुर राहायचे ही भुमिका सध्या नागरिकांनी घेतली आहे. त्यामुळे बहुतेक लोकांनी करोनाच्या लसीकरणाला खाजगी रूग्णालयाला पसंती दिली आहे.

लखमापूर येथे लसीकरण सुरु करावे

सध्या दिवसेंदिवस करोनाचे रुग्ण अधिक प्रमाणात निघत आहे. त्यामुळे 45 वयांच्या पुढील नागरिकांसाठी गावापातळीवर लस उपलब्ध करून द्यावी. लखमापूर, दहेगाव, वागळुद आदी गावातील नागरिकांना लखमापूर येथील आरोग्य उपकेंद्रात करोनाची लसीकरण सुरू करावे अशी मागणी जनतेतून होत आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com