लसीकरण : एकीकडे गोंधळ तर दुसरीकडे आदर्शवत नियोजन

लसीकरण : एकीकडे गोंधळ तर दुसरीकडे आदर्शवत नियोजन

भऊर | बाबा पवार

सहा दिवसाच्या प्रतीक्षेनंतर देवळा तालुक्याला अवघे एक हजार लसीचे डोस प्राप्त झाले. लशी आल्याची माहिती मिळताच लसीकरण केंद्रावर अलोट गर्दी झाली. यासाठी ना तालुका स्थरावरून काही उपाययोजना करण्यात आल्या, ना स्थानिक प्रशासनाने नियोजन केले...

परिणामी, अनेक ठिकाणी गोंधळ उडाला तर बहुतांश ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे चित्र पहावयास मिळाले. दरम्यान, यास अपवाद होते ते देवळा तालुक्यातील दहिवड हे गाव.

येथे येणाऱ्या प्रत्येकास टोकन देण्यात आले, नागरिकांना ताठकळत उभे राहावे लागू नये यासाठी शाळेत सामाजिक अंतराचे भान ठेवत बसण्याची सोय करण्यात आली. तसेच पंखा, पिण्याच्या पाण्याची सोयदेखील असल्याने येथील लसीकरण केंद्राच्या उत्तम नियोजनाचा प्रत्यय इथे आला.

लसीचा तुटवडा व सहा दिवसाची प्रतीक्षा या कारणामुळे तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर लस टोचून घेण्यासाठी नागरिकांनी तोबा गर्दी केल्याचे पहावयास मिळाले.

नियोजनाचा अभाव असल्याने खामखेडासह बहुसंख्य प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे चित्र यावेळी पहावयास मिळाले.

खरंतर नागरिकांनी कोरोना संसर्गचा धोका पाहता यावेळी संयम ठेवत नियमांचे पालन करणे अपेक्षित असतांना ४५ वर्षांपुढील नागरिकांनी मात्र यावेळी गोंधळ करत नियोजनाला कुठेतरी बाधा पोहोचविण्याचे काम केले.

दहिवड येथे टोकन पद्धतीने नियोजन केल्यामुळे नियमानुसार सुरू असलेले लसीकरण
दहिवड येथे टोकन पद्धतीने नियोजन केल्यामुळे नियमानुसार सुरू असलेले लसीकरण

सुयोग्य नियोजनामुळे दहिवडला आदर्शवत लसीकरण

लसीचा तुटवडा त्यात होणारी गर्दी या गोष्टींमुळे आरोग्य विभागावर प्रचंड ताण येत आहे. हा तणाव कमी करण्यासाठी स्थानिक प्रशासनाच्या वतीने नियोजन करणे खूपच गरजेचे आहे. दहिवड ग्रामस्थांनी या बाबत चांगला आदर्श निर्माण केल्याचे दिसून आले.

दहिवड येथील सरपंच आदिनाथ ठाकूर तसेच सामाजिक कार्यकर्ते तथा प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष संजय दहिवडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, दहिवड आरोग्य केंद्रासमोर लस घेण्यासाठी नागरिकांची गर्दी होऊ लागतात स्थानिक प्रशासनाने नियोजनाला सुरवात केली.

नागरिकांना टोकन पद्धतीने नंबर देऊन एकाच वेळी होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण मिळवले. नागरिकांच्या रांगा लागल्यावर, दोन व्यक्तींमध्ये सामाजिक अंतर पाळले जाईल याची काळजी घेण्यात आली. वृद्ध व्यक्तींना टोकन देऊन सामाजिक अंतर राखत सावलीत बसविण्यात आले. या पद्धतीने नियोजन केल्यामुळे लसीकरण अत्यंत सुरळीत व नियमानुसार पार पडले.

दहिवड येथे वृद्धांना सामाजिक अंतर राखत सावली, हवा, पाणी याची केलेली व्यवस्था
दहिवड येथे वृद्धांना सामाजिक अंतर राखत सावली, हवा, पाणी याची केलेली व्यवस्था
खामखेडा आरोग्य केंद्रासमोर सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
खामखेडा आरोग्य केंद्रासमोर सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

नाहीतर लसीकरण केंद्रच बनतील सुपर स्प्रेडर

सहा दिवसानंतर अत्यल्प प्रमाणात लसीचा पुरवठा झाला तर तालुक्यात एकाच वेळी लस घेण्यासाठी गर्दी होणार हे अपेक्षित असतांना तालुका प्रशासनच्या वतीने कुठलेही नियोजन केल्याचे दिसून आले नाही. तर दुसरीकडे स्थानिक प्रशासनाने देखील याबाबत दुर्लक्ष केल्याचे दिसून आहे. परिणामी, बहुतांश ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. असेच जर नियोजनशून्य लसीकरण सुरू राहिल्यास लसीकरण केंद्रच सुपर स्प्रेडर ठरू नयेत म्हणजे झालं.

खामखेडा आरोग्य केंद्रासमोर सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
खामखेडा आरोग्य केंद्रासमोर सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

ग्रामस्थरीय समितीला नियोजनाचे आदेश द्या!

करोना प्रतिबंधात्मक उपाययोजना व ग्रामस्थरीय नियोजन करण्यासाठी प्रत्येक गावात ग्रामस्थरीय कोरोना समितीची स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून लसीकरण केंद्र किंवा अन्य ठिकाणी नियोजन करणे गरजेचे आहे. मात्र ते अनेक ठिकाणी दिसून येत नसल्याने तालुका प्रमुख या नात्याने तहसीलदार यांनी या समितीला योग्य नियोजनाचे आदेश दिल्यास नक्कीच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होऊ शकते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com