नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

केरळमध्ये करोना पुन्हा डोके वर काढत असून त्या पार्श्वभुमीवर खबरदारी म्हणून केरळातून राज्यात येणार्या प्रवाशांना करोना चाचणी बंधनकारक असणार आहे. याबाबत राज्य शासनाने सर्व जिल्हाधिकार्यांना आदेश जारी केले आहे. ते बघता जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर असून संबंधित अधिकार्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.

केरळ राज्यामध्ये वाढणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येच्या पार्श्वभूमीवर या राज्यातून येणाऱ्या प्रवाशांना राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये प्रवेश देताना कोरोना चाचणी करणे, विलगीकरण करणे, गरज पडल्यास क्वॉरेंटीन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

तसे आदेशच सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याने आता नाशिक जिल्ह्यातही केरळातून येणाऱ्या प्रवाशांना याबाबी बंधनकारक केल्या आहेत.

गोवा, दिल्ली, राजस्थान आणि गुजरात या राज्यातून येणाऱ्या प्रवाशांना महाराष्ट्रात येताना कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली होती.

त्याच धर्तीवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून या चार राज्यांसोबतच आता केरळ राज्याचाही समावेश झाला आहे. या राज्यातून येणाऱ्या प्रवाशांनाही आयसीएमआरच्या आदेशानुसार नियम, अटी लागू करण्यात आल्या आहेत. त्यात विमानाने येणाऱ्यांचे स्वॅब विमानतळावरच तर रेल्वे आणि रस्ते मार्गाने येणाऱ्या प्रवाशांनाही कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. यातील ज्यांचे अहवाल पाॅझिटीव्ह येतील अशांना लागलीच क्वॉरेंटीन करण्याच्या सूचना देण्यात येणार आहे.

तर अहवाल येईपर्यंत या सर्वच प्रवाशांना विलगीकरण कक्षात ठेवले जाणार आहे. याबाबत आरोग्य विभागाचे पथकही तयार असून, अशा प्रवाशांवर लक्ष राहावे, त्यांची माहीती शासन-प्रशासनास मिळावी यासाठी शासकीय यंत्रणेकडून योग्य ते नियोजन सुरु असून, तसे आदेशही आपत्ती व्यवस्थापण प्रमुखांकडून देण्यात आले आहे. त्यामुळे आता जिल्ह्याच्या सिमांवर केरळातून येणाऱ्या प्रवाशांवर नियंत्रण ठेवले जाणार आहे.