करोनाने मृत शेतकर्‍याच्या कुटुंबाला आधार

करोनाने मृत शेतकर्‍याच्या कुटुंबाला आधार

चांदवड । नंजय पाटील | Chandwad

जगात मानवतेचा झरा अजुनही जीवंत असल्याचा प्रत्यय चांदवडचे तहसीलदार प्रदीप पाटील (Chandwad Tehsildar Pradip Patil) व गटविकास अधिकारी महेश पाटील (Group Development Officer Mahesh Patil) यांनी आपल्या कर्तव्यनिष्ठेतून आणून दिला आहे.

प्रहार संघटनेचे (Prahar Sanghatana) गणेश निंबाळकर यांनी करोना (corona) काळात मृत्यू झालेल्या काळखोडे येथील शेतकर्‍याच्या (farmers) कुटुंबाची व्यथा या अधिकार्‍यांच्या निदर्शनास आणून दिली, तेव्हा त्यांच्याही काळजाला पाझर फुटला. तहसीलदार प्रदीप पाटील यांनी मृत शेतकर्‍याच्या तीनही अपंग मुलांना तातडीने अपंग पेन्शन योजनेचा (Handicapped Pension Scheme) तर गटविकास अधिकारी महेश पाटील यांनी वृध्द विधवेस घरकूल योजनेचा लाभ मिळवून दिला. त्यामुळे दु:खाचा डोंगर कोसळून संपूर्णपणे निराधार झालेल्या शेतकरी कुटुंबास मोठा आधार मिळून जगण्याची नवी उभारी प्राप्त झाली आहे.

तालुक्यातील काळखोडे येथील सामान्य शेतकरी जिभाऊ शेळके यांचे करोना काळात निधन झाले. त्यांच्या निधनानंतर वृध्द पत्नी व तीन अपंग मुलांवर दुःखाचा डोंगरच कोसळला. शेळके कुटुंबाची वाताहत होऊन उपासमारीची वेळ येऊन ठेपली असतांना तीन लेकरांना मनाने खचलेली वृध्द आई कशीबशी शेती करत सांभाळत आहे. एक मुलगा गोरख, मुलगी राणी व ज्योती यांचे शिक्षण (education) जेमतेम दहावीपर्यंत झालेले असून ते सध्या घरीच असतात. वडिलांच्या निधनानंतर शाळा (school) कशी शिकायची, आपल्याला कोण शाळेत सोडेल, अशा विवंचनेत असलेल्या कुटुंबाने प्रहार संघटनेचे उपजिल्हाप्रमुख निंबाळकर यांच्याशी संपर्क साधला.

त्यांनी शेळके कुटुंबाची व्यथा जाणून घेत चांदवडचे तहसीलदार प्रदीप पाटील (Tehsildar Pradip Patil) यांना ही माहिती दिली. तहसीलदार पाटील यांनीही माणुसकीचे भान ठेवत शेळके कुटुंबास विविध शासकिय योजनांची तंतोतंत माहिती देऊन व सर्वतोपरी मदत केली. त्यांना अपंगत्वाचे वेतन सुरू करून दिले. शिवाय पंचायत समितीचे गटविकास अधिकारी महेश पाटील (Group Development Officer of Panchayat Samiti Mahesh Patil) यांच्या माध्यमातून निराधार झालेल्या शेळके कुटुंबास तात्काळ घरकुल मंजूर करून देत पहिला हप्ताही वर्ग केला. घरकुलात तिनही अपंग मुलांना किचन व शौचालयाचा योग्य वापर करता येईल, याचीही खबरदारी घेत नियोजन करण्यात आले.

तहसीलदार पाटील व प्रहारचे निंबाळकर यांनी चांदवड नगरपरिषदेचे (Chandwad Municipal Council) प्रथम नगराध्यक्ष भूषण कासलीवाल यांनाही शेळके कुटुंबाच्या मदतीसाठी आवाहन केले असता त्यांनी आपल्या मित्र परिवारसह उपविभागीय अधिकारी चंद्रशेखर देशमुख, तहसीलदार पाटील, जैन ऑटोमोबाईल्सचे संचालक नंदलाल पारख, माजी नगरसेवक रवींद्र अहिरे, अरिहंत ट्रॅक्टर्सचे संचालक प्रतिक बाफना यांच्या सहकार्यातून या अपंग मुलांना तीनचाकी दोन सायकली उपलब्ध करुन दिल्या. या सायकलींमुळे त्यांना दैनंदिन जीवनात मोठी मदत होणार आहे.

उपरोक्त अधिकारी वर्गासह निंबाळकर, कासलीवाल, तहसीलदार पाटील यांनी स्वतः शेळके कुटुंबियांच्या मळ्यात जाऊन सायकलींचे वाटप केले. सायकली मिळाल्याने तीनही मुलांचा आनंद गगनात मावत नव्हता. त्यांना अक्षरश: अश्रू अनावर झाले होते. यावेळी प्रतिक बाफना, गौरव जाधव, प्रकाश चव्हाण, चंद्रभान गांगुर्डे, दत्तू शेळके, शरद शेळके, नितीन फंगाळ, बाळासाहेब डुकरे, शिवाजी शेळके, बाळासाहेब शेळके, अनिल शेळके, नाना शेळके, अण्णा शेळके, अशोक बैरागी, नरहरी शेळके, वाल्मीक शेळके, भाऊसाहेब शेळके आदिंसह सरपंच, उपसरपंच, ग्रा.पं. सदस्य, पोलीस पाटील व स्थानिक ग्रामस्थ नागरिक उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com