करोनावर उपचार करताना रेमेडेसिवीर टाळा

अवघ्या दहा दिवसांत नामको हॉस्पिटलमध्ये कोविड केअर सेंटरची उभारणी
करोनावर उपचार करताना रेमेडेसिवीर टाळा

नाशिक | प्रतिनिधी

नामको चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून अवघ्या दहा दिवसांत नामको हॉस्पिटलमध्ये कोविड केअर सेंटरची सुरवात करण्यात आली, हे अतिशय कौतुकास्पद काम आहे. करोनाचा रुग्ण बरा होण्यासाठी आवश्यक ती औषधे डॉक्टरांनी द्यावी परंतु रेमडिसिव्हिरचा वापर आवश्यक असेल तरच करावा शक्यतो त्याचा वापर टाळण्यात यावा असे आवाहन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.

यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, गेल्या वर्षीच्या तुलनेत दुपटीने रुग्णसंख्या वाढली असल्याने औषधे व ऑक्सिजनचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. मात्र तरी देखील आवश्यक त्या सोयी सुविधा शासन, प्रशासन व सेवाभावी संस्था यांच्यामार्फत उपलब्ध करून देण्यात येत आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहर व जिल्ह्यात बेडची संख्या कमी असतांना आपण ती मोठ्या प्रमाणात वाढविली आहेत. वैदयकीय क्षेत्रात ज्याला आवश्यक आहे त्याला प्राधान्याने मदत करून देण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे. ऑक्सिजनचा साठा मुबलक प्रमाणात ठेऊन कोविड केअर सेंटरचे काम सुरू ठेवावे.

आपल्या पूर्वजांनी मोठं कष्टाने सामाजिक कार्य सुरू केलं आहे ते अविरत सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे. लॉकडाऊनचा परिणाम अतिशय चांगला होत असून रुग्ण संख्या कमी होण्यास त्याचा अतिशय फायदा होत आहे. पुढची लाट येण्याच्या अगोदर आपण तयारी ठेवावी लागेल. कायमस्वरूपी व्यवस्था झाल्याने याचा भविष्यात देखील उपयोगी ठरणार आहे असेही पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले.

यावेळी आमदार दिलीपराव बनकर म्हणाले की, नामको चॅरिटेबल हॉस्पिटलम व बँकेच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचे सामाजिक कार्य अविरतपणे सुरू आहे. कोरोनाच्या काळात ऑक्सिजन बाबत योग्य ते सहकार्य करण्यात येईल असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

नामको विश्वस्त मंडळाने अत्यंत कमी कालावधीमध्ये प्रशस्त , हवेशीर व आठ बायपॅप व्हेंटीलेटरसह आठ बेडचा अतिदक्षता विभाग व ऑक्सीजन सुविधेसह ४२ बेड कोविड रूग्णांसाठी उभारल्या आहेत. फक्त १० दिवसातच या कोविड केअर सेंटरचे व्हेंटिलेटर्स , बायपॅप मशीन्स,

ऑक्सीजन , गॅस पाइपलाईन , बायपॅप , हेंटीलेटर्स , मल्टीपॅरा मॉनीटर्स , ईन्फुजन पंप इ . उपलब्ध करून प्रत्येक वार्डात करमणूकीसाठी टी.व्ही . वाय फाय , टेलीफोन यंत्रणा , पिण्याचे गरम व थंड पाणी ,

अत्याधुनिक ३ फोल्ड बेड , साईड लॉकर , कार्डिआक टेबल , येण्या व जाण्यासाठी स्वतंत्र प्रशस्त रस्ते तसेच तज्ञ कन्सल्टंटस , प्रशिक्षीत निवासी डॉक्टर्स , परीचारीका , सेवकवर्ग व आरोग्यदायी आहार या सर्व प्रकारच्या सेवा , सोयीसुविधा शासकिय दरात रूग्णांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत .

अतिशय नयनरम्य अशी अंतर्गत सजावट , सेवाभावी व तज्ञ ४ कंन्सल्टंटस , १५ प्रशिक्षीत निवासी डॉक्टर्स , ३४ परीचारीका व सेवक वर्ग यामुळे या कोविड केअर सेंटर मध्ये उपचार घेतांना रुग्णांचे मनोबल उंचावुन त्यांचा कोरोनातुन मुक्त होण्यास मदत होणार आहे.

आज नामको हॉस्पिटल संचलित आर.एम. डी. कोविड केअर सेंटरचे उदघाटन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते पार पडले. यावेळी आमदार दिलीपराव बनकर, नामको बँकेचे अध्यक्ष सोहनलालजी भंडारी, सचिव शशिकांतजी पारख, माजी आमदार वसंत गिते,विजय साने, हेमंत धात्रक, अशोक साखला, महेश लोढा,चंद्रकांत पारख, प्रकाश दायमा, जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर जगताप,रंजन ठाकरे, राजेंद्र डोखळे, जयप्रकाश जातेगावकर, यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com