नाशिकमध्ये रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७१ टक्के
नाशिक

नाशिकमध्ये रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७१ टक्के

प्रतिबंधित क्षेत्र घटले; ८९९ पैकी केवळ २६६ कार्यरत

Abhay Puntambekar

नाशिक । प्रतिनिधी Nashik

शहरात करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आता महापालिका प्रशासनाकडून अँटिजेन चाचणी हजारापर्यंत करण्यात आल्याने, तसेच कोविड चाचण्यातदेखील वाढ करण्यात आली आहे. खासगी रुग्णालयातून मोठ्या प्रमाणात कोविड चाचण्या होत असल्याने कोविड रुग्ण तत्काळ समोर येऊ लागल्याने रुग्णांचा आकडा वाढत आहे. यातच आता दाखल रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७१ टक्क्यांपर्यंत गेले असल्याने आता एकूण रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे.

महापालिका क्षेत्रात आता करोनाचा मोठा संसर्ग सुरू झाला असून जुलै महिन्यात प्रतिदिन सुमारे १८० नवीन रुग्ण समोर येत असून दररोज सरासरी पाच जणांचा मृत्यू होत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून करोना चाचणी दररोज ५०० आणि अँटिजेन चाचणी १००० अशा एकूण १५०० चाचण्या केल्या जात असल्याने परिणामी या नवीन बाधित रुग्णांपासून होणारा संसर्ग टाळण्यात महापालिकेला मोठे यश आले आहे. तसेच महापालिकेकडून कोविड रुग्णांवर आणि संशयित रुग्णांवर चांगल्या प्रकारे उपचार केले जात असल्याने दाखल रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६० टक्क्यांवरुन ७१ टक्क्यांपर्यंत गेले आहे.

शहरात ६ एप्रिल रोजी शहरात पहिला रुग्ण सापडल्यानंतर संपूर्ण एप्रिल महिन्यात केवळ चार प्रतिबंंधित क्षेत्र होते. नंतर प्रतिबंधित क्षेत्राची संख्या वाढत जाऊन काही परिसरात पुढच्या काळात नवीन रुग्ण वाढल्याने पुन्हा तो परिसर प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करावे लागले. प्रतिबंधित क्षेत्राची व्याप्ती पुढे परिसराऐवजी केवळ रुग्ण राहत असलेली इमारत आणि पुढे इमारतीतील त्या रुग्णांचे घर अशाप्रकारे प्रतिबंधित क्षेत्र बनविण्यात आले होते.

जुलै महिन्यात मोठ्या प्रमाणात संसर्ग सुरू झाल्याने पुन्हा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्याची पाळी महापालिका प्रशासनावर आली. यात वडाळागाव परिसर, पखालरोड परिसर, जुने नाशिक परिसर, पंचवटीतील फुलेनगर, राहुलवाडी, रामनगर अशा भागानां मायक्रो झोन म्हणून जाहीर करण्याचे काम झाले आहे. ६ एप्रिल ते २२ जुलै या काळात शहरात ८९९ प्रतिबंधित क्षेत्र निर्माण झाले आहे. यापैकी नवीन रुग्ण न आढळल्याने २६६ प्रतिबंधित क्षेत्रावरील निर्बंध हटवण्यात आले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com