मंदिर
मंदिर
नाशिक

ग्रामीण भागातील टाळ, मृदुंगाचा नाद हरवला,

मंदिरांना लागली भाविकांची आस

Gokul Pawar

Gokul Pawar

ओझे | Oze

गेल्या तीन ते चार महिन्यापासून राज्यासह जिल्ह्यातील परिस्थितीत बदल दिसून येत आहे. जिल्ह्यातील मंदिरे अद्यापही बंद असून पूर्वी ज्या मंदिरात भजन कीर्तन सोहळा असायचा आज तीच मंदिरे कुलूप बंद असल्याने एकदमच चित्र बदलून गेले आहे.

याला कारणीभूत आहे, करोना. गेल्या काही दिवसापासून करोना महामारीने परिस्थिती बदल झाला आहे. अनेक शहर , गावे अद्यापही लॉक डाऊन असून या सोबत मंदिरेही कुलूपबंद आहेत. देऊळ बंद असल्यामुळे दर्शन होत नसल्याने देवाचे देवपणचं जणू हरपले असे चित्र पाहायला मिळत आहे.

शहरासह ग्रामीण भागातही कोरोनाने शिरकाव केल्याने ग्रामीण भागही कधी नव्हे तो सुना झाला आहे. यातच गावकऱ्यांना एकत्र आणणारे देऊळ ही एकटे पडले आहे. ग्रामीण भागातील अनेक धार्मिक उत्सव बंद झाले. मंदिरे बंद असल्याने पहाटेचा काकडा आरती नाही. संध्याकाळचा हरीपाठ नाही. एकादशी चे भजन नाही. सप्ताहातील किर्तनसेवा नाही, भारूड नाही, पारायणे नाही हे सर्व बंद असल्यामुळे ग्रामीण भागातील धार्मिकउत्सवावर एक प्रकारे विरजण पडले असे वाटु लागले आहे. जेष्ठ नागरिकांची बसणारी बैठक मोडीत निघाली आहे.

लॉक डाऊनच्या काळात टाळ, पखवाजाचा आवाज, अभंग, पेटीचा सूर आता कानावर पडत नसल्यामुळे ग्रामीण भागातील धार्मिक उत्सवास केव्हा सुरुवात होईल, याकडे डोळे लावून ग्रामस्थांसह उभे आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com