
येवला । Yeola
एप्रिल मे महिना म्हटला की, मोठ्या प्रमाणात लग्न सरायची घाई असते. पण करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता लग्नसराई मात्र थंडावली आहे. ब्रेक द चेन अंतर्गत तालुक्यात मोठी उलाढाल होणार्या पैठणी बाजारपेठा बंद करण्यात आल्याने पैठणी व्यवसांयीकांना याचा मोठा फटका बसला आहे.
मागील वर्षी मार्च महिन्यात सुरू झालेले करोना चे वादळ अजूनही थांबण्यास तयार नसल्याने, मागील वर्षी अनेक विवाह सोहळे लॉकडाऊन मुळे पुढे ढकलण्यात आले होते. पुढच्या वर्षी थाटामाटात लग्न करू अशा आशेवर असलेल्या वधूवरांना मात्र दुसरे वर्ष ही करोना च्या सावटाखाली चालल्याने व मागील वर्षापेक्षा यावर्षी करोनाची साखळी वाढत चालल्याने त्याचा परिणाम विवाह सोहळ्यांवर झाल्याने काही विवाह सोहळे पुढे ढकलले आहेत.
तसेच अनेक विवाहसोहळे घरगुती वातावरणात होत आहे. अनावश्यक खर्चाला ही फाटा दिला जात असल्याने, त्याचा सगळ्यात जास्त फटका हा पैठणी व्यवसायाला झाला आहे.
मागील वर्षी करोनाचा फटका बसलेल्या पैठणी व्यवसाय दुसर्या वर्षीही करोनाच्या सावटाखाली चालल्याने, दुकानात आणुन ठेवलेल्या माल विकायचा कसा व घेतलेले कर्ज कसे फेडावे अशा विवंचनेत पैठणी दुकानदार आहे.