नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

शहर, जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असून जिल्हा परिषदेलाही करोनाचा विळखा बसू लागला आहे. अर्थसंकल्पीय सभेत सहभागी झालेल्या एका अधिकाऱ्यास करोनाची लागन झाल्यानंतर सेवक वर्गातही करोनाने शिरकाव केला आहे.

पदाधिकारी दालनातील शिपायांना करोनाचा लागन झाल्याचे समोर आले आहे.करोनाचा वाढता विळखा लक्षात घेऊन अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर यांनी मुख्यालयात कडक निर्बंध लावण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.

जिल्हयात करोनाची रूग्ण संख्या दिवागणिक वाढत असताना आता प्रशासकीय कार्यालयांमध्ये पुन्हा करोनाचा शिरकाव होऊ लागला आहे. जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पीय सभेत उपस्थित एका वरिष्ठ तत्पर अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाली. यानंतर अनेक विभागप्रमुख क्वारंटाईन झालेले आहे.

यापाठोपाठ आता अनेक विभागातील सेवकही करोना पॉझिटिव्ह येऊ लागले आहेत. पदाधिकारी दालनामधील दोन शिपायांसह अनेक विभागातील सेवक पॉझिटिव्ह आल्याने जिल्हा परिषदेत घबराट पसरली आहे. या पार्श्वभूमीवर, अध्यक्ष क्षिरसागर यांनी सोमवारी (दि.१५) तातडीने प्रशासनाची बैठक घेतली.

या बैठकीत मुख्यालयातील निर्बंबध पुन्हा कडक करण्याचे आदेश काढले. मुख्य प्रवेशव्दारे बंद ठेवण्यात यावे, बाहेरील व्यक्तीस प्रवेश बंदी करावी, कामा व्यातिरिक्त कोणासही जिल्हा परिषदेत प्रवेश देऊ नये, प्रवेशकर्त्यांना मास्क अनिवार्य करावा, प्रत्येक विभागाच्या प्रवेशव्दारावर सॅनिटायझर अनिवार्य करण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले. यावेळी अतिरिक्त मुख्यकार्यअधिकारी रवींद्र शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर उपस्थित होते.

ग्रामीण भागात सेंटर वाढवा

ग्रामीण भागात करोना लसीकरण सुरू झाले आहे. अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर यांनी लसीकरणाचा आढावा घेतला. यात प्रामुख्याने प्राथमिक आरोग्य केंद्रांवर ही लस दिली जात असल्याने लसीकरणासाठी लोकांची मोठी गर्दी होत असल्याचे दिसत आहे. साधारण ४०० ते ५०० लोक एकत्र येत आहे.

त्यामुळे कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता अधिक आहे. यासाठी आरोग्य विभागाने लसीकरण सेंटर वाढवावे अशी सूचना अध्यक्ष क्षिरसागर यांनी आरोग्य विभागाला केली. त्यानंतर क्षिरसागर यांनी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांना पत्र देत ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्रासह, उपकेंद्रावर देखील लसीकरण सुरू करावे अशी मागणी केली आहे.