नामपूर ग्रामीण रुग्णालयात करोना सेंटर सुरू

नामपूर ग्रामीण रुग्णालयात करोना सेंटर सुरू

नामपूर । Nampur

मोसमखोर्‍याचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या येथील ग्रामीण रूग्णालयात करोना केअर सेंटरचे उद्घाटन आ. दिलीप बोरसे यांच्या हस्ते करण्यात आले.

करोनाच्या वाढत्या प्रभावामुळे करोना बाधीत रूग्णांची मोठ्या प्रमाणात आर्थिक बचत होवून चांगली सोय निर्माण करण्यात आली आहे.

नामपूर हे गाव बागलाण तालुक्यात सर्वात मोठे शहर आहे.

शहराची लोकसंख्या 30 हजारापेक्षा जास्त असून परिसराची लोकसंख्या एक लाखापेक्षा जास्त आहे. करोना या आजारामुळे या परिसरातील अनेक नागरिकांनी आपला जीव गमावला आहे. आजही रुग्णसंख्या खूप मोठ्या वाढत आहे.

सर्वसामान्य गरीब नागरिकाला मालेगाव, नाशिक, मुंबई येथील दवाखान्याचा खर्च परवडत नसल्याने या ठिकाणी करोना केंद्र सुरू करण्याची जनतेची मागणी पाहता प्रथमत: माजी आ. संजय चव्हाण, दीपिका चव्हाण यांनी थेट आरोग्य मंत्री राजेश टोपे, पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याशी सातत्याने पाठपुरावा केला होता.

या सोबत युवा नेते आकाश पगार, शेतकरी संघटनेचे दीपक पगार, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष रविंद्र पगार, जि.प. सदस्य यतीन पाटील, सरपंच रेखा पवार, सामजिक कार्यकर्ते दादा भामरे, नामदेव सावंत, तहसीलदार जितेंद्र इंगळे, गटविकास अधिकारी एस.के. कोल्हे, ग्रामविकास अधिकारी केशव इंगळे, वैद्यकीय अधिकारी यु.पी. हेंद्रे, डॉ. सुनील मोराणकर, डॉ. निलेश सोनवणे, तलाठी राजू काष्टे यांनी सतत शासन व आरोग्य खात्याशी संपर्क साधून पाठपुरावा केला होता.

अखेर शासनाने याबाबत सकारात्मक विचार करून नामपूरकरांच्या आरोग्याच्या दृष्टीने हे केंद्र सुरू केले आहे.

या सेंटरसाठी ऑक्सीजनच्या नळकांड्यांच्या सुरक्षेसाठी सामाजिक कार्यकर्ते मनींद्र सावंत यांनी एका दिवसात मोफत पत्र्यांचे शेड बनवून दिले. तसेच कुपखेडा येथील पोलीसपाटील बाळासाहेब ठाकरे यांनी रूग्णांना शुध्द पिण्याचे पाणी मिळावे यासाठी सुमारे 70 हार रूपये किंमतीचे शुध्दीकरण यंत्र या ठिकाणी बसवून दिले आहे.

आ. बोरसे यांनी पुढे बोलतांना सांगितले की, मोसम खोर्‍यातील जनतेला या केंद्राचा नक्कीच फायदा होणार असून आगामी काळात दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. या कामी आरोग्य केंद्राच्या कर्मचार्‍यांच्या कामकाजाचे आ. बोरसे यांनी कौतुक केले. या उदघाटन कार्यक्रमप्रसंगी शहर-परिसरातील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी 7 रुग्ण उपचारासाठी दखल झाले आहेत. सर्वांना ऑक्सिजन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून 20 बेड रुग्णालयात उपलब्ध आहे. अजून 120 बेड उपलब्ध होणार आहेत. आम्ही चांगल्या प्रकारचे उपचार देण्यास कटिबद्ध आहोत.

- डॉ. सुनील मोराणकर, ग्रामीण रूग्णालय, नामपूर

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com