आदिवासी भागात करोना प्रबोधनाचे धडे

लसीकरण जनजागृती मोहीम : आश्रमशाळांचे शिक्षकांचा सक्रिय सहभाग
आदिवासी भागात करोना प्रबोधनाचे धडे

नाशिक | Nashik

दुर्गम-अतिदुर्गम भागातील आदिवासी समाजात करोनाविषयी अनेक गैरसमज पसरले आहेत.

करोना प्रतिबंधात्मक लसीकरणामुळे मृत्यू होत असल्याची अफवा आदिवासी बांधवांमध्ये पसरली आहे. त्यातूनच आदिवासी पट्ट्यात लसीकरणाचा टक्का कमी आहे.

हा आजार व लसीकरणाबाबतचे गैरसमज दूर करण्यासाठी आदिवासी विकास विभागाकडून विशेष जनजागृती केली जात आहे. या मोहिमेत शासकीय व अनुदानित आश्रमशाळेचे शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सक्रिय सहभाग आहे.

आदिवासी समाजात करोना आजाराविषयी अज्ञान तसेच उपचारासंबंधी माहिती नसल्याने आदिवासी बहुल भागात कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण दुसऱ्या लाटेत अधिक दिसत आहे. त्याचप्रमाणे ताप, सर्दी, खोकला आदी करोना आजाराची लक्षणे असली तरी आदिवासी समाजात कोरोना चाचणी न करता घरगुती औषधे घेतात. त्यामुळे आजार बरा होण्याऐवजी वाढत जाऊन प्रसंगी रुग्ण दगावत असल्याचे पाहणीतून समोर आले आहे.

करोना प्रतिबंधात्मक लसीकरणासंबंधी इतर समाजघटकांपेक्षा आदिवासी समाजात भय आणि नकारात्मकता आहे. आदिवासी समाजात कोरोना आजाराविषयी जनजागृती तसेच लसीकरणासंबंधी प्रबोधन होणे महत्त्वाचे आहे.

नाशिक एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पच्या प्रकल्प अधिकारी वर्षा मीना यांच्या संकल्पनेतून तसेच नियोजनातून अनुदानित आणि शासकिय आश्रमशाळेतील शिक्षकांकडून शाळेच्या कार्यक्षेत्रातील आदिवासी भागात जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. शालेय सुटीच्या काळातही संबंधित शिक्षक आदिवासी गावे, वाड्या, वस्त्या व पाड्यांवर जाऊन आदिवासी बांधवांना कोरोना प्रबोधनाचे धडे देत आहे.

आश्रमशाळेच्या शिक्षक आणि मुख्याध्यापकांसोबतच प्रकल्प कार्यालयातील सर्व सहायक प्रकल्प अधिकारी, विस्तार अधिकारीही पर्यवेक्षक मोहिमेत उत्स्फूर्तपणे प्रबोधन करत आहे. शिक्षक व अधिकारी थेट घरापर्यंत माहिती सांगत असल्याने आदिवासी बांधवांकडूनही प्रतिसाद मिळत आहे.

शिक्षकांवर जबाबदारी

पेठ, दिंडोरी, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, निफाड, सिन्नर या तालुक्यांतील आश्रमशाळेच्या कार्यक्षेत्रातील आदिवासी गावे, पाडे आणि वस्त्यांमध्ये प्रबोधनाची जबाबदारी संबंधित शाळेच्या शिक्षकांवर सोपविण्यात आली आहे. शिक्षक दररोज दोन तास नियोजित ठिकाणी जाऊन आदिवासी बांधवांची भेट घेऊन प्रबोधन करत आहे.

आदिवासी बांधवांमधील लसीकरणाचा टक्का वाढविण्यासह करोनाची भीती दूर करण्यासाठी प्रबोधन केले जात आहे. या मोहिमेत शिक्षकांसह अधिकाऱ्यांना सामावून घेण्यात आले आहे.

- वर्षा मीना, प्रकल्पाधिकारी

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, नाशिक

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com