
पंचवटी | प्रतिनिधी | Panchavati
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातील वरिष्ठ लिपिक या पदाकरिता टीसीएस कंपनीच्या माध्यमातून ऑनलाईन परीक्षा घेण्यात येत आहे. कृषी विभागाच्या वरिष्ठ लिपिक पदाकरिता १०५ तर सहायक अधिक्षक पदाकरिता ५३ जागांची भरती प्रक्रिया राबविली जात आहे. म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या पुणे विद्यार्थी वस्तीगृह महाविद्यालयात या पदाकरिताचे परीक्षा केंद्र देण्यात आले आहे...
याच परीक्षा केंद्रात एक परीक्षार्थी परीक्षा केंद्रात कॉपी करण्याच्या उद्देशाने मोबाईल फोन व इतर इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस पायातील सॅण्डलमध्ये लपवून घेऊन जात असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित सुरज विठ्ठलसिंग जारवाल (वय- २३, रा. जारवालवाडी (सागरवाडी), पो. धासला, ता. बदनापूर, जि. जालना) हा कृषी विभागाच्या वरिष्ठ लिपिक पदाच्या ऑनलाईन परीक्षेसाठी म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पुणे विद्यार्थी वसतिगृहाच्या महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर दुपारी १२:३० ते १४:३० वाजेच्या काळात परीक्षा देण्यासाठी आला होता.
सर्व परीक्षार्थी हे परीक्षा केंद्रात दाखल होत असताना प्रत्येकाची सुरक्षा रक्षकांकडून तपासणी केली जात होती. यावेळी संशयित आरोपी याची तपासणी करत असताना तो तेथून पळून जाऊ लागला असता इतर सुरक्षा रक्षकांच्या मदतीने त्याला पकडण्यात आले.
त्याची तपासणी केली असता त्याच्याकडे परीक्षा केंद्रात वापरास बंदी असलेले व कॉपी करण्याच्या उद्देशाने आपल्या पायातील सॅण्डलच्या तळाव्यामध्ये मोबाईल फोनसह इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस लपवून आणले होते. तर सॅंडो बनियान घालून त्याला आतील खिशाला छिद्र पडून प्रश्न पत्रिकेचे फोटो काढता येईल अशी व्यवस्था केली होती. सुरक्षा रक्षकांनी वेळीच सतर्कता दाखवत पुन्हा एकदा स्पर्धा परीक्षांमध्ये होणारी हायटेक कॉपीची घटना उघड केली आहे. यात संशयिताला म्हसरूळ पोलिसांनी अटक केली असून पोलीस अधिक तपास करत आहे.
याच केंद्रावर पूर्वी देखील कॉपीचे प्रकार घडल्याची चर्चा
काही दिवसांपूर्वी याच परीक्षा केंद्रावर तलाठी भरतीच्या पेपरमध्ये एका मुलीने अश्याच प्रकारे कॉपी केल्याचा आरोप त्याच वर्गातील परीक्षार्थीने केला होता. परंतु त्यावेळी संस्थेच्या माध्यमातून हि केवळ अफवा असल्याची माहिती दिली होती. जर पोलिसांनी त्यावेळचे सीसीटीव्ही तपासले तर तो प्रकार देखील उघड होऊ शकतो असे त्या परीक्षार्थीचे म्हणणे आहे.