नाशिक | Nashik (प्रतिनिधी)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा नियोजीत नाशिक दौरा रद्द झाल्याने तसेच जिल्हाधिकार्यांनी दिलेल्या पत्राच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलीस प्रशिक्षण प्रबोधिनी येथे प्रशिक्षण पुर्ण केलेल्या उपनिरिक्षकांच्या तुकडीचा होणारा दिक्षांत संचलन सोहळा रद्द झाला आहे.

राज्यभरातील पोलीस अधिकार्यांना प्रशिक्षण देणार्या महाराष्ट्र पोलीस प्रशिक्षण प्रबोधिनीचा सध्या प्रशिक्षण घेत असलेल्या पोलीस उपनिरिक्षकांचा नियोजीत दिक्षांत संचलन समारंभ ऐनवेळी रद्द करावा लागला आहे. या समारंभासाठी उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा दौरा निश्चित झाला होता.

मात्र शहरात कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा दौरा रद्द झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

प्रबोधिनीत सध्या ६६८ प्रशिक्षणार्थी उपनिरिक्षकांची ११८ व्या तुकडीचे प्रशिक्षण पुर्ण झाले आहे. मागील वर्षी मार्च मध्ये सुरू झालेल्या कोरोनाच्या साथीमुळे या प्रशिक्षणार्थांच्या प्रशिक्षणात अनेक अडथळे आले.

करोना काळात त्यांचे शाररिक प्रशिक्षण बंद होते. तसेच सर्वांना सामाजिक अंतर पाळत, ऑनलाईन व्याख्यात्यांचे विचार ऐकावे लागले. तर दोन महिन्यांपुर्वीच मोठी काळजी घेऊनही ६८ पेक्षा अधिक प्रशिक्षणार्थींना कोरोनाची लागण झाली होती. तर या सर्वाच्या परिणामी यांचा प्रशिक्षण कालावधी लांबत जाऊन तो १७ महिन्यांपेक्षाही अधिक झाला आहे.

३० मार्चला दिमाखदार दिक्षांत संचलन करून सेवेत रुजू होण्याची तयारी या प्रशिक्षणार्थींची सुरू असतानाच कोरोनाने पुन्हा एकदा या तुकडीचा हिरमोड केला आहे. संचनाचा कार्यक्रमच रद्द झाला असून आता प्रबोधिनीच्या संचालिका अश्वती दोरजे व वरिष्ठ अधिकार्यांच्या उपस्थितीत औपचारीक शपथविधी होऊन ही तुकडी बाहेर पडणार आहे.

माध्यमांना नो एंन्ट्री

नियोजीत दिक्षांत संचलन सोहळा रद्द झाल्यानंतर औपचारीक होणार्या शपथविधी कार्यक्रमासाठी प्रसिद्धी माध्यमांना नो एंन्ट्रीचा निर्यण अधिकार्यांनी घेतला आहे. यास २६ मार्चला याच तुकडीचे बक्षिस वितरण व बडाखाना नंतर झालेल्या सामुहिक नृत्य व त्याचे समाज माध्यमांवर प्रसारीत झालेल्या व्हिडीओची पार्श्वभूमी असल्याची चर्चा आहे.