ऑक्सिजन, रेमडेसिव्हिरचा पुरवठयावर पथकांमार्फत नियंत्रण

जिल्हाधिकारी मांढरे : अवास्तव वापर टाळण्याचा प्रयत्न
ऑक्सिजन, रेमडेसिव्हिरचा पुरवठयावर पथकांमार्फत नियंत्रण

नाशिक । Nashik

रुग्णालयांनी ऑक्सिजन व रेमडेसिव्हिरची वाढती मागणी लक्षात घेवून शासनाच्या मार्गदर्शक सुचानांप्रमाणेच त्याचा वापर करावा. औषधांचा अवास्तव वापर टाळण्यासाठी शहरी व ग्रामीण भागात पथकांमार्फत नियंत्रण ठेवण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले. ही पथके आजपासूनच कार्यरत करण्यात आली आहेत.

जिल्ह्यातील ऑक्सिजन पुरवठा व रेमडेसिव्हिर बाबत जिल्ह्यातील पथक प्रमुख प्रांताधिकारी, तहसिलदार व संबंधित अधिकाऱ्यांसोबत दूरदृश्य प्रणालीद्वारे घेण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. ते म्हणाले, सद्यस्थितीमध्ये संपूर्ण राज्यभर ही कोविड रूग्णांची संख्या वाढत असल्यामुळे राज्यस्तरावरून होणारा ऑक्सिजन पुरवठा यामध्ये अटीतटीची परिस्थिती निर्माण झालेली आहे.

याकारणास्तव जिल्ह्यातील सर्व रूग्णालयातील ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटरबेड, आयसीयू बेड इत्यादी बाबत माहिती संकलित करण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने सदर रुग्णालयांमध्ये त्याप्रमाणे व्यवस्था अस्तित्वात आहे किंवा नाही याची खात्री करण्यात यावी, सदर रुग्णालयांना पुरवठा होणारा ऑक्सिजन तज्ञांचे मार्गदर्शन सूचनांनुसार योग्य रीतीने वापरला जात आहे किंवा नाही व संबंधित रुग्णालयांची वितरण व्यवस्था, साठवणूक क्षमता इत्यादी बाबतीत नियंत्रण आणि तपासणी करण्यात यावी.

तसेच रेमडेसिव्हिर इंजेक्शन च्या बाबतीत सध्या मोठ्या प्रमाणात मागणी वाढत असून त्या अनुषंगाने काही रुग्णालये सरळ रुग्णांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना सदरचे इंजेक्शन विकत घेऊन आणण्याबाबत लिहून देत आहेत. जिल्ह्यात सदर औषधाची टंचाई अथवा काळाबाजार या बाबतीतकाही तक्रारी प्राप्त झाल्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सदर औषधाचे वाटपाकरिता मध्यवर्ती कक्ष स्थापन केलेला आहे.

या कक्षाच्या माध्यमातून जिल्ह्यात दररोज प्राप्त रेमडेसिव्हिर इंजेक्शन साठा, जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या व ज्यांना सदर औषध आवश्यक आहे अशा रुग्णालयांचे मागणीप्रमाणे प्राप्त साठा विचारात घेवून दैनंदिन वाटप नियंत्रण केले जात आहे. सदर साठा रुग्णालयात प्राप्त झाल्यानंतर तो साठा संबंधित ज्या रुग्णांकरिता मागणी केला आहे. त्याच रुग्णांना दिला आहे किंवा कसे, याची खात्री करण्यासाठी तपासणी पथके नेमून कार्यवाही करणार असल्याचे मांढरे यांनी सांगितले.

बैठकीस नाशिकचे अतिरिक्त जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे, मालेगाव अतिरिक्त जिल्हाधिकारी धनंजय निकम, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, नाशिक महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त प्रवीण आष्टीकर, तहसीलदार शिवकुमार आवळकंठे, प्रशांत पाटील तसेच जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार, जिल्हा उद्योग केंद्र, अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे हजर होते.

अतिरिक्त वापर टाळण्याचे आवाहन
ऑक्सिजनव रेमडेसिव्हिर इंजेक्शन चा सरसकट सर्व रुग्णांनी वापर करणे योग्य नाही. शासनव क्षेत्रातील तज्ञ आणि इंडियन मेडिकलअसोशिएशन यांचे द्वारे निर्गमित मार्गदर्शक सुचानांप्रमाणेच या बाबींचा वापर करावा. जेणेकरून सदर औषधांचा अवास्तव वापर टाळता येईल आणि खऱ्या गरजू रुग्णांना हे वेळेवर उपलब्ध होवून त्यांना फायदा होईल असे आवाहन जिल्हाधिकारी मांढरे यांनी केले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com