व्यापक लसीकरणाने कोरोनावर नियंत्रण

डॉ. प्रकाश आमटे, डॉ. नितीन करमळकर, डॉ. अश्विनकुमार तुपकरी, डॉ. संदीप माने यांचे मत
व्यापक लसीकरणाने कोरोनावर नियंत्रण

नाशिक:

कोरोनाची झळ साऱ्या जगभर पसरली आहे. यातून बाहेर पडण्यासाठी व्यापक लसिकरणाची गरज आहे असे मनोगत मान्यवरांनी व्यक्त केले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे कोविड-19 आजारासंदर्भात लसिकरणासाठी जनजागृती या विषयावर ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे, विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु डॉ. नितीन करमाळकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठानचे संचालक डॉ. अश्विनकुमार तुपकरी, ओरिजिन फाऊंडेशनचे संचालक डॉ. संदीप माने आदी मान्यवरांनी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेस कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक संदीप कुलकणी व अधिकारी वर्ग ऑनलाईन उपस्थित होते.

याप्रसंगी डॉक्टर आणि समाजसेवा या विषयावर ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे यांनी सांगितले की, समाजसेवा ही निरपेक्षपणे केली पाहिजे. कोविड-19 पेक्षाही अनेक भयंकर आजार कदाचित भविष्यात येतील, मात्र खंबीरपणे त्याचा सामना करावा. कोविड-19 चा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रत्येकाने मास्क वापरणे, सुरक्षित अंतर राखणे व हात वारंवार धुणे या गोष्टींकडे कायम लक्ष द्यावे. कोविड संदर्भात देण्यात येणारी लस प्रभावी असून ती प्रत्येकाने घ्यावी अशा पध्दतीने विद्यार्थ्यांनी समाजजागृती करावी आपले आरोग्य सुरक्षित असेल तर समाज सुरक्षित राहिल. यासाठी वैयक्तीक स्वच्छता व सामाजिक भान जागृत ठेऊन जगावे. कोविड करीता कार्य करणारे डॉक्टर, वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्ती व समाजसेवकांचे कार्य महान आहे. सुदृढ आणि निरोगी समाज घडविण्यासाठी प्रत्येकाने खंबीरपणे प्रयत्न करावेत असे त्यांनी सांगितले.

विद्यापीठाचे मा. प्रभारी कुलगुरु डॉ. नितीन करमळकर यांनी कार्यशाळेचे प्रास्ताविक करतांना सांगितले की, कोविड संदर्भात सुरु करण्यात आलेली लसिकरण मोहिम व्यापक स्वरुपात व्हावी. यासाठी समाजात सकारात्मक विचारांचे आदान-प्रदान होणे गरजेचे आहे. कोविडला समाजातून हद्पार करण्यासाठी शासनाने दिलेल्या निर्देशांचे व सूचनांचे सर्वांनी पालन करणे गरजेचे आहे. कोविड संदर्भात आरोग्य क्षेत्रातील व्यक्ती, डॉक्टर, विद्यार्थी व समाजसेवकांचे काम उल्लेखनीय आहे. समाजाला कोविडपासून वाचविण्यासाठी प्रत्येकाने लसिकरण करणे गरजेचे आहे. लोकसहभागातून ही मोहिम यशस्वी करण्यासाठी आपण तयार राहिले पाहिजे आणि समाजाला देखील सक्षम केले पाहिजे. कोविड-19 लसिकरण संदर्भात सर्वांनी सकारात्मक विचार करावा. आरोग्य सुरक्षित राखण्यासाठी नियमित मास्कचा वापर, सॅनिटायझर व सुरक्षित अंतराबरोबर लसिकरण केल्यास आपण निरोगी राहू असे त्यांनी सांगितले.

या कार्यशाळेत औरंगाबादचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठानचे संचालक डॉ. अश्विनकुमार तुपकरी यांनी वैद्यकीय विद्यार्थ्याचे आत्मभान या विषयावर बोलतांना सांगितले की, आरोग्य शिक्षणातील विद्यार्थ्यांनी सामाजिक आत्मभान जागृत ठेऊन काम करावे. कोविड-19 आजाराचा सामना करण्यासाठी समाजात सकारात्मक विचार पसरवावेत. याकरीता स्वयंसेवकांचा गट तयार करुन स्थानिक स्तरावर जनजागृतीचे कार्य करावे. लोकचळवळीतून लोकांना आजाराचा प्रतिबंध करण्यासाठी कोणती काळजी घ्यावी याचे सोप्या भाषेेत माहिती द्यावी. कोविड प्रतिबंधासाठी लसिकरण ही अत्यंत महत्वपूर्ण मोहिम आहे. समाजात जागरुकता निर्माण करणे गरजेचे असून त्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा असे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी ओरिजिन फाऊंडेशनचे संचालक डॉ. संदीप माने यांनी संकटकाळ - संयमाने भविष्याकडे विषयावर मार्गदर्शन करतांना सांगितले की, शरीर, मन आणि जीवनशक्ती या त्रिकुटावर जीवन चालत आहे. कोरोना काळात आपले शरीर सुदृढ असेल मन स्थिर आणि संयमी असेल तर आपण कोणत्याही रोगावर मात करु शकतो. कोविड आजारावर मात करण्यासाठी सर्वांनी लसिकरण करणे गरजचे आहे. आपली सामाजिक जबाबदारी जागृत ठेऊन जीवन जगावे. निसर्गाने दिलेली शक्ती अपार असून मन मजबूत करा, सकस आहाराचे सेवन, प्राणायम, योगसाधना व सकारात्मक विचारांनी आपले आयुष्य नक्कीच वाढणार आहे. आयुष्यातला प्रत्येक क्षण महत्वाचा आहे. संकटाच्या काळात न घाबरता शांत चित्ताने त्याचा प्रतिकार करण्याचा विचार करा, यश तुमचेच आहे असे त्यांनी सांगितले.

कार्यशाळेच समन्वयन व सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी केले. यु-टयुब लिंकव्दारा प्रसारित कार्यशाळेस आरोग्य क्षेत्रातील मान्यवर, अभ्यागत, अधिष्ठाता, प्राचार्य, महाविद्यालय प्रमुख, सर्व संलग्नित महाविद्यालयातील विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते. या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी सचिन धेंडे, बाळासाहेब पेंढारकर, विनायक ढोले यांनी परिश्रम घेतले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com