विकासात अभियंत्यांचे योगदान : भुसे

सिव्हील इंजिनिअर असोसिएशनतर्फे प्रदर्शन
विकासात अभियंत्यांचे योगदान : भुसे

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

दिवसेंदिवस वाढत असलेल्या शहराच्या विस्ताराला समर्थपणे सामोरे जात बांधकामाच्या ( Construction)माध्यमातून शहराला सुंदरता प्रदान करण्याचे काम अभियंते सामाजिक बांधिलकी जोपासत करत आहेत. बदलत्या काळानुसार तसेच नागरीकांच्या गरजा ओळखून कार्य होत आहे. बदलत्या मालेगावच्या विकासासाठी खर्‍या अर्थाने व्यावसायिक अभियंता संघटनेचे योगदान महत्वपुर्ण ठरत असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री दादा भुसे ( Guardian Minister Dada Bhuse)यांनी येथे बोलतांना केले.

येथील प्रोफेशनल सिव्हिल इंजिनिअर असोसिएशनतर्फे साठफुटी रोडवरील जाजू कंपाऊंड येथे आयोजित करण्यात आलेल्या चार दिवशीय बांधकाम विषयक भव्य प्रदर्शनाचे उद्घाटन पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. आ. मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल, असोसिएशन अध्यक्ष मधुकर पाटील, सुर्यकांत वराडे, दिनेश जगताप, सचिन शहा, जनसंपर्क अधिकारी राजेश अलिझाड, जेष्ठ अभियंते बन्सीलाल कांकरिया, इव्हेंट पार्टनर गुरूदास गावडे, शहादत अली, हेमंत साठे आदी मान्यवर व्यासपिठावर उपस्थित होते.

या शहराने आपणांस घडवले आहे. त्यांचं आपण देणं लागतो ही भावना ठेवत सिव्हिल इंजिनिअर असोसिएशनची स्थापना केली गेली. सामाजिक बांधिलकी सर्वश्रेष्ठ मानत संस्थेचे कार्य सुरू आहे. संस्थेचे सदस्य सर्व क्षेत्रात कार्यरत आहेत. नव्या पिढीस आधुनिक तंत्रज्ञान युगाची भुरळ आहे. त्यामुळे त्यांच्या गरजा ओळखून बदलत्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहे. यामुळेच बांधकाम क्षेत्रातील नवीन संकल्पना शहरवासीयांना समजून देण्यासाठी सुंदर व नियोजनबद्ध प्रदर्शन भरविण्यात आले असल्याचे कौतुक करत पालकमंत्री भुसे पुढे म्हणाले, जिल्ह्यातील नागरिकांनी या प्रदर्शनास भेट देऊन विविध सुविधांची नवनिर्मिती बघायला हवी. अभियंत्यांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योजक म्हणून सेवेचा वसा स्विकारला याचा अभिमान वाटत असल्याचे त्यांनी शेवटी बोलतांना सांगितले.

यावेळी मार्गदर्शन करतांना आ. मौलाना मुफ्ती यांनी कुठल्याही नव्या कामात इंजिनिअरची गरज असते. शहराच्या वाढत्या गरजा पुरविण्यासाठी आपण दक्षता घेतली. दरवर्षी नवीन संकल्पना शहरवासीयांना देतात हे कौतुकास्पद असल्याचे सांगत बांधकाम प्रदर्शनाची मुक्तकंठाने प्रशंसा केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प संयोजक भगीरथ आसदेव यांनी, अध्यक्ष मधुकर पाटील यांनी इंजिनिअर असोसिएशनचे कार्याची माहिती उपस्थितांना दिली. सुत्रसंचलन कुंदन चव्हाण व शाहिद मेहमूद तर आभार दिनेश जगताप यांनी मानले. यावेळी राजेंद्र धोंडगे, संभाजी भोसले, राजेश अलीझाड, गौतम साखला, विरेंद्र शहा, हेमंत हिरे, भालचंद्र निकुंभ, सतिश सरोदे, प्रशांत कुलकर्णी, राजेंद्र अहिरे, विशाल शर्मा, निलेश कुलकर्णी, देवराम हिरे, बाजीराव भामरे, दिपक मोदी, चेतन कांकरिया, संदीप भुसे, मनोज पगारे, कलवींदसिंग आसी, अविनाश पवार, दिपक अहिरे कार्यक्रम यशस्वीतेसाठी पुढाकार घेतला. पहिल्याच दिवशी बांधकाम प्रदर्शनास मोठ्या संख्येने शहरासह तालुकावासियांनी हजेरी लावली.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com