
नवीन नाशिक | प्रतिनिधी
अंबड परिसरात गटारीचे पाणी मिश्रित पाणीपुरवठा होत असल्यामुळे रोगराईचा प्रश्न निर्माण झाला असून पाणीपुरवठा विभागाला वारंवार सांगूनही त्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे पाणीपुरवठा स्वच्छ, वेळेवर व ज्यादा दाबाने व्हावा अशी मागणी अंबड वासियांनी पाणीपुरवठा मुख्य अधिकाऱ्यांकडे केली आहे.
अंबड मधील अंबड वजन काटा, दत्तनगर परिसरातील साईशाम अपार्टमेंट, अथर्व अपार्टमेंट, तुळसाई किराणा परिसर, शांती सदन, साईसंकुल अपार्टमेंट, शिवपार्वती किराणा परिसर, बुद्धविहार परिसर, दत्तनगर परिसर, दातीर नगर, कारगिल चौक परिसर, भवानी माता मंदिर परिसर, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे उद्यान परिसर, माऊली चौक परिसर व पाण्याच्या टाकी या परिसरामध्ये गेल्या पाच ते सहा महिन्यापासून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत नाही.
दरम्यान, या परिसरात मोठ्या प्रमाणावर कामगार वस्ती असुनही पाणी वेळेत सोडले जात नाही. अर्धा ते एक तास कमी दाबाने हा पाणीपुरवठा मनपाकडून केला जात असल्याने, तसेच अनेक दिवसांपासून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे उद्यान परिसरामध्ये ड्रेनेज लाईनचे पाणी पिण्याच्या पाण्यामध्ये मिश्रीत होत असल्यामुळे ड्रेनेज मिश्रित पाणी घरांमध्ये येत आहे. ड्रेनेज मिश्रित पाणीपाईप लाईन मध्ये येत असल्याचे संबंधित अधिकारी यांना निदर्शनास आणून दिल्यानंतरही सदर समस्या सोडविण्यासाठी मनपा कडून टाळाटाळ केली जात आहे.
या दुषित पाण्यामुळे परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर साथीचे आजार पसरले आहे. नागरिकांना मुबलक पाणी मिळत तसेच, नागरिकांकडे पाण्याचा साठा करण्यासाठी साधने उपलब्ध नसल्यामुळे परिसरातील नागरिकांचे हाल होत आहे.
तरी पाणीपुरवठ्याची वेळ अर्धा तासावरून वाढवून दोन तास तरी पाणी सोडावे व लवकरात लवकर पाईप लाईन दुरुस्त करून पाणीपुरवठ्याची वेळ वाढवून देऊन नागरिकांना पिण्यायोग्य पाणी उपलब्ध करून द्यावे अशी परिसरातील नागरिकांची मागणी आहे. यासंबधी मनपा कार्यकारी अभियंता रवींद्र धारणकर पाणीपुरवठा विभाग यांना निवेदन देण्यात आले आहे.
यावेळी शिवसेना शाखाप्रमुख शरद रामदास दातीर, चंद्रकांत जमधडे, अरुण भास्कर दातीर, कैलास दळवी, उत्तम गाढवे, विष्णू दोंदे, महादेव मोकळकर, बेनामेचर फर्नांडिस, संतोष गाढवे, मनोज आहेर, स्वप्नील शिरसाठ, निखिल दातीर, नवनाथ गालफाडे, कावेरी शिरसाठ, ज्योती शेळके, सुलाबाई गायकवाड, कावेरी शिरसाठ, रंगनाथ शेळके, संगीता भरीत, जॉन फर्नांडिस, अविनाश गवई, शिल्पा राऊत, अनिल चोथे, वैशाली बिडवे, रामनाथ झाडगे, जिभाऊ बच्छाव, पोपट महाले यांच्यासह परिसरातील नागरिकांच्या सह्या निवेदनावर आहेत.