जिल्हा बँकेच्या २१ संचालकांना दिलासा

जिल्हा बँकेच्या २१ संचालकांना दिलासा

नाशिक । विजय गिते Nashik

सहकारी बँकांना बुडवणार्‍या संचालकांना 10 वर्षे निवडणूक लढवण्यास बंदी घालणारा निर्णय तत्कालीन फडणवीस सरकारने घेतला होता.

मात्र, आता सहकार कायद्यातील हा निर्णय बदलत महाविकास आघाडी सरकारने यात दुरुस्ती केली आहे.त्यामुळे नव्याने झालेल्या या कायद्यान्वये नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 21 संचालकांवर असलेली टांगती तलवार दूर झाली असून त्यांचा निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

फडणवीस सरकारच्या काळात सहकारी बँका बुडवणार्‍या संचालकांवर 10 वर्षांची निवडणूक बंदी घालण्यात आली होती. अनियमित कामकाजामुळे सहकारी बँका अडचणीत येण्यास कारणीभूत ठरलेल्या संचालक मंडळास 10 वर्षे कोणत्याही सहकारी बँकेची निवडणूक लढविण्यावर बंदी घालण्यात आली होती.

मात्र, या निर्णयामुळे चांगले काम करणार्‍या संचालकांनाही फटका बसत असल्याने ही दुरुस्ती केल्याचा दावा आघाडी सरकारमधील सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केला आहे.राज्यातील सहकारी क्षेत्रात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची निर्विवाद सत्ता आहे. या माध्यमातून आघाडीचे नेते राज्यातील राजकारणाला सातत्याने कलाटणी देत आले आहेत.

आर्थिक अनियमितता आणि बेशिस्तीमुळे राज्यातील अनेक सहकारी बँका दिवाळखोरीत गेल्या आहेत. संचालकांच्या मनमानी कारभाराचा मोठा फटका अनेक बँकांना बसला आहे. राज्यातील सहकारी बँकांची शिखर संस्था असलेली राज्य सहकारी बँकही याला अपवाद राहिलेली नाही.

राजकीय नेते पदाचा गैरवापर करून सहकारी बँकांना आर्थिक दिवाळखोरीत आणतात. अशा भ्रष्ट संचालक मंडळावर बरखास्तीची कारवाई होते. पुढे हेच संचालक मंडळ निवडणुकीत विजयी होतात. याचा परिणाम बँकेच्या कर्ज वसुलीवर होतो. तसेच न्यायालयीन प्रकरणांचा पाठपुरावाही होत नाही.

या सर्वांचा परिणाम होऊन ठेवीदारांमध्येही विपरीत संदेश जातो, त्यामुळे अशा संचालकांना निवडणूक लढविण्यास बंदी घालण्याचा निर्णय घेतल्याचे तत्कालीन फडणवीस सरकारचे म्हणणे होते.

मात्र, हा निर्णय पूर्णपणे राजकीय असून विशेषतः काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची कोंडी करण्यासाठी फडणवीस सरकारने जाणीवपूर्वक तो घेतला होता,अशी टीका आघाडी सरकारमधील आमदार, मंत्री तसेच कार्यकर्त्यांकडून होत होती. म्हणूनच हा निर्णय घेतले जात असल्याचे आघाडी सरकारतर्फे सांगितले जात आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com