आरोग्य यंत्रणेने गाफील राहू नये

कळवाडी-निमगाव गटाच्या आढावा बैठकीत खा. डॉ. पवार यांचे निर्देश
आरोग्य यंत्रणेने गाफील राहू नये

मालेगाव । प्रतिनिधी

करोनाचे थैमान आरोग्यासह सर्वच विभागांच्या एकजुटीने सुरू असलेल्या परिश्रमामुळे नियंत्रणात येत आहे. करोनाची दुसरी लाट बर्‍यापैकी नियंत्रणात येत असली तरी आरोग्य यंत्रणेने गाफील न राहता म्युकरमायकोसिस तसेच तिसर्‍या लाटेचा धोका लक्षात घेत पूर्वतयारी करत सज्ज राहावे, असे आवाहन करीत खा.डॉ. भारती पवार यांनी लसीकरण व करोना तपासणीवर यंत्रणेने अधिक लक्ष देण्याचे आवाहन केले.

येथील पंचायत समिती सभागृहात नांदगाव तालुक्यातील कळवाडी व निमगाव गटांची आढावा बैठक खा.डॉ. भारती पवार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी कळवाडी, निमगाव गटातील करोना उपचार केंद्र तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रात बाधितांसह इतर रुग्णांची कशापद्धतीने उपचार व काळजी घेतली जात आहे, किती रूग्ण व किती रुग्णांवर घरीच उपचार केले जात आहेत, ऑक्सिजन व व्हेटीलेटर बेडची उपलब्धता यासह लसीकरण तसेच करोना तपासणीचा सविस्तर आढावा घेत खा.डॉ. पवार यांनी माहिती घेतली.

यावेळी प्रांत विजयानंद शर्मा, तहसीलदार चंद्रजित राजपूत, गटविकास अधिकारी जितेंद्र देवरे, वैद्यकिय अधिकारी डॉ. हितेश महाले, डॉ. शैलेश निकम, वीज वितरणचे मुख्य अभियंता जे.के.भामरे,भाजप जिल्हाध्यक्ष सुरेशनाना निकम, लकीआबा गिल, जि.प. सदस्य जे.डी. हिरे, दीपक देसले, पंकज शेवाळे, पं.स. सदस्य अरूण पाटील, व्यापारी आघाडी अध्यक्ष नितीन पोफळे, ज्येष्ठनेते दीपक पवार, दादा जाधव, सुरेश काळे, शिवाजी कराड, महेश वाघ आदींसह विविध विभागांचे अधिकारी बैठकीस उपस्थित होते.

करोनाची दुसरी लाट आटोक्यात येत असल्याचे दिलासादायक चित्र दिसून येत आहे. आरोग्य यंत्रणेचे परिश्रम यासाठी निश्चितच कौतुकास्पद असल्याचे स्पष्ट करत खा.डॉ. पवार पुढे म्हणाल्या, आरोग्य, पोलीस, प्रशासकीय यंत्रणा, आशा सेविका आदी सर्वच विभागांची कामगिरी कौतुकास्पद आहे. रूग्णसंख्या घटत असली तरी तिसर्‍या लाटेचा धोका लक्षात घेत यंत्रणेने पुर्वतयारी करत सज्ज राहावे. म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य रोगाच्या बाबतीत जनजागृतीसह संबंधित आजाराने बाधित रुग्णांवर उपचार करावेत. यासाठी लागणारे इंजेक्शन उपलब्ध करावीत, अशा सुचना देखील त्यांनी केल्या.

करोना बाधितांना घरातच विलगीकरण करण्यात आले असल्यास अशा नागरीकांवर बारीक लक्ष ठेवण्यात यावे. तसेच त्यांना घराबाहेर फिरण्यापासून मज्जाव करण्यात यावा. घरात विलगीकरण असलेल्यांच्या हातावर शिक्का मारण्यात यावा. यासाठी घरोघरी जावून अशा रुग्णांची माहिती गोळा करून ती प्रशासन यंत्रणेस आशा स्वयंसेविकांनी द्यावी तसेच पोलीस यंत्रणेनेदेखील सतर्क राहत घराबाहेर फिरणार्‍या बाधितांना मज्जाव करावा, अशी सुचना खा.डॉ. पवार यांनी यावेळी केली.

करोना उपचार केंद्रात तसेच करोना नियंत्रणासाठी सक्रिय राहणार्‍या सर्वच आरोग्य सेवकांचे शंभर टक्के लसीकरण अधिकार्‍यांनी करून घ्यावे, असे आवाहन करत खा.डॉ. पवार यांनी लसीकरणाच्या दुसर्‍या डोसवर जास्तीतजास्त भर देण्यात यावा. ज्यांनी लसीकरण केले नाही अशा नागरिकांनादेखील लसीकरणासाठी प्रवृत्त करण्याची गरज आहे. जनतेने देखील लसीकरण करून घ्यावे, यासाठी आरोग्य यंत्रणेने जनजागृती अभियान हाती घ्यावे, अशी सूचना खा.डॉ. पवार यांनी शेवटी केली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com