नाशिक l Nashik (प्रतिनिधी)

नाशिक महापालिकेत विविध कामांत ठेकेदारांना पुढे करून आऊट सोर्सिंगच्या माध्यमातून भ्रष्टचार केला जात आहे. ठेकेदारास डोळ्यासमोर ठेऊन कामांचे डॉकेट, अटीशर्ती व नियम बनवले जातात आहे. ठेकेदारीच्या माध्यमातून संपूर्ण शहराला वेठीस धरण्याचे व महापालिकेला लुटण्याचे काम सत्ताधारी भाजपकडुन सुरू आहे.

या ठेकेदारीच्या निषेधार्थ व सत्ताधार्यांच्या भ्रष्ट कारभाराकडे नाशिककरांचे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी शहर कॉग्रेसच्यावतीने महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवनासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

महापालिकेत सफाई कामांचा ठेका, व्हॉलमन, वाहन चालक, गार्डन, नाट्यगृह सफाई अशी अनेक ठेक्यांमध्ये गैरव्यवहार होत आहे. आता नवीन सर्वात मोठा ठेका एक विशिष्ठ ठेकेदारास समोर ठेऊन आणला जात आहे. तसेच घरपट्टी, पाणीपट्टी वसुलीचा ठेका दिला जात आहे.

भ्रष्ट व काळ्या यादीतील ठेकेदारांची फौज घेऊन मनपाला लुटण्याचे काम करीत आहे. दुर्दैवाने काही बडे अधिकारी यात गुंतले असल्याचा आरोप कॉग्रेसने केला आहे. या आंदोलनाची भूमिका शहराध्यक्ष शरद आहेर, मनपा कॉग्रेस गटनेते शाहु खैरे व नगरसेविका आशा तडवी यांनी स्पष्ट केली.