काँग्रेसतर्फे चांदवडला पुढील आठवड्यात शेतकरी संवाद मेळावा

काँग्रेसतर्फे चांदवडला पुढील आठवड्यात शेतकरी संवाद मेळावा

नाशिक । प्रतिनिधी

जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) शेतकऱ्यांच्या कांदा व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून राज्यातील या गतिमान सरकारला शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही.अशी परिस्थिती आहे. त्यामुळे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रांताध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या प्रमुख उपस्थितीत चांदवड येथे पुढील आठवड्यात शेतकरी संवाद मेळावा आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते, जिल्ह्याचे प्रभारी डॉ.राजू वाघमारे (Dr. Raju Waghmare) यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या मेळाव्याच्या पूर्वतयारीसाठीची बैठक सोमवारी (दि.५) डॉ. वाघमारे व सहप्रभारी ब्रिज किशोर दत्त यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस कमिटी एम.जी.रोड येथे झाली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.यावेळी माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल,जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे,शहराध्यक्ष आकाश छाजेड उपस्थित होते.

डॉ.वाघमारे म्हणाले, राज्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत असून राज्य शासनाला त्यांच्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही, हे सरकार केवळ घोषणा करण्यातच मश्गुल आहे. नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानंतर मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने बांदावर येऊन दौरा करून गेले. मात्र, ते जाताच पुन्हा गारपीट (Hail) झाली आणि मोठे नुकसान झाले.

जिल्ह्यात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री येऊ नये, अशीच भावना शेतकऱ्यांची (Farmers) आहे,असे सांगून वाघमारे म्हणाले, शेतकऱ्यांच्या बाजूने उभा राहील, असा काँग्रेस हा एकमेव पक्ष असून शेतकऱ्यांचे सुख जानणारा हा पक्ष आहे. म्हणूनच काँग्रेसने (Congress) शेतकऱ्यांचे प्रश्न हाती घेऊन या मेळाव्याचे आयोजन केले आहे.

जिल्ह्यातील कांदा,टोमॅटो, भाजीपाला आदी शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्यांना योग्य प्रमाणात भावही मिळत नाही. कांदा, टोमॅटो तर भाव नसल्यामुळे रस्त्यावर फेकला जात आहे.नाशिक व शेजारच्या नगर जिल्ह्यातील जो शेतमाल पिकतो.त्याच्या विक्रीची व दराची कायमची व्यवस्था लावावी अशी आमची मागणी आहे.

तर चांदवड येथे दि. १५ जूनपूर्वी शेतकरी संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या मेळाव्याला प्रांताध्यक्ष नाना पटोले,माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक थोरात व पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह राज्यस्तरीय नेते उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान, या मेळाव्याचे आयोजन माजी आमदार शिरीषकुमार, जिल्हाध्यक्ष डॉ.तुषार शेवाळे, शहराध्यक्ष आकाश छाजेड यांच्या सहकार्याने करण्यात येणार आहे.या मेळाव्यानंतर नाशिक शहरातील मध्यमवर्गीयांचेही अनेक प्रश्न आहेत. या संदर्भातही नाशिकमध्ये मेळावा घेण्यात येणार आहे.

तसेच शहरवासीयांचे अनेक प्रश्न असून महागाईही वाढली आहे. शहराचा विकास थांबला आहे. यासंदर्भात आम्ही या मेळाव्याच्या माध्यमातून लोकांसमोर जाणार आहोत. काँग्रेसची सत्ता ज्यावेळी होती,त्यावेळी शहराचा विकास झाला तो अलीकडच्या काळात खुंटला असल्याचा आरोपही डॉ. वाघमारे यांनी यावेळी केला.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com