मालेगाव प्रभाग समित्यांमध्ये काँग्रेस-शिवसेनेचे वर्चस्व

सेनेच्या कल्पना वाघ, महागठबंधनचे एजाज अहमद बिनविरोध
मालेगाव प्रभाग समित्यांमध्ये काँग्रेस-शिवसेनेचे वर्चस्व

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

महापालिकेच्या (Malegaon Municipal Corporation ) चारही प्रभागांच्या (ward committees) सभापतिपदाच्या निवडणूकीत सत्तारूढ काँग्रेस-शिवसेनेने ( Congress & Shivsena ) या निवडणुकीत आपले प्रभुत्व तीन सभापतिपद ( Ward Committee Chairman )पटकावत कायम राखले. महागठबंधन आघाडीस प्रभाग चार सभापतिपदावर समाधान मानावे लागले. शहराचे लक्ष लागलेल्या प्रभाग एकमध्ये भाजप उमेदवाराने माघार घेतल्याने सेनेच्या कल्पना विनोद वाघ यांची बिनविरोध निवड केली गेली.

जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या अध्यक्षतेखाली आज ऑनलाईन ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. मनपाच्या आगामी निवडणूक पार्श्वभूमीवर प्रभाग समिती सभापती निवडणूक काँग्रेस, शिवसेना व महागठबंधन आघाडीतर्फे प्रतिष्ठेची करण्यात आली होती. प्रभाग चारमध्ये अय्याज अहमद मोहंमद सुलतान अन्सारी यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने सभापतिपदी त्यांची बिनविरोध निवड होण्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे.

उर्वरित तीन प्रभागांमध्ये मात्र दुरंगी लढत रंगण्याचे चिन्ह दिसत होते. शहरातील पश्चिम भागाचे प्रभुत्व असलेल्या प्रभाग एकमध्ये भाजपतर्फे भरत बागुल यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर सेनेतर्फे पुन्हा विद्यमान सभापती कल्पना विनोद वाघ यांना संधी देण्यात आली होती. मात्र अंतिम क्षणी भाजपच्या बागुल यांनी निवडणुकीतून माघार घेतली. सर्वप्रथम प्रभाग एकमध्ये निवडणूक पार पडली. बागुल यांनी माघार घेतल्याने सेनेच्या वाघ बिनविरोध निवडून आल्याचे जिल्हाधिकारी मांढरे यांनी जाहीर केले.

यानंतर प्रभाग दोनच्या सभापतीची निवडणूक घेण्यात आली. काँग्रेसच्या रजियाबी शेख इस्माईल यांना 14 मते मिळाल्याने त्या विजयी झाल्या. जनता दलाच्या सय्यद शबाना सय्यद अकिल यांना सहा मते मिळाल्याने त्यांचा पराभव झाला. प्रभाग तीनमध्ये झालेल्या दुरंगी लढतीत काँग्रेसचे अब्दुल अजीज अब्दुल सत्तार 12 मते मिळवत विजयी झाले. त्यांनी महागठबंधन आघाडीच्या साजीद अब्दुल रशीद यांचा पराभव केला. साजीद यांना 11 मते मिळाली, तर प्रभाग चारमध्ये महागठबंधनच्या एजाज अहमद मो. सुलतान यांचा एकमेव अर्ज दाखल झाला असल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली.

निवडणूक प्रक्रियेसाठी आयुक्त भालचंद्र गोसावी, उपायुक्त राहुल पाटील, नगरसचिव शाम बुरकुल यांनी सहाय्य केले. नवनिर्वाचित सभापतींचे आयुक्त गोसावी, महापौर ताहेरा शेख यांनी पुष्पगुच्छ देत स्वागत केले.सेनेच्या कल्पना वाघ यांची बिनविरोध निवड होताच शिवसैनिकांतर्फे फटाके फोडून जल्लोष केला गेला. वाघ याचा अजिंक्य भुसे यांनी सत्कार केला. यावेळी उपमहापौर नीलेश आहेर, स्थायी समिती सभापती राजाराम जाधव, सखाराम घोडके, जयप्रकाश बच्छाव, प्रमोद शुक्ला, मनोहर बच्छाव, प्रकाश अहिरे, विनोद वाघ, जिजाबाई बच्छाव, पुष्पा गंगावणे, जिजाबाई पवार आदी उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com